अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळल्याची दुर्घटना काही वेळापूर्वी घडली आहे. AI-171 हे विमान बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर प्रकारचे होते. २३० प्रवासी आणि १२ कर्मचाऱ्यांसह एकूण २४२ जण त्यातून प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानाने आज (१२ जून २०२५) दुपारी एक वाजून १७ मिनिटांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. त्यानंतर काही वेळातच ते मेघाणीनगरजवळच्या धारपूर या नागरी परिसरात कोसळल्याचे समजते. त्या भागातून काळा धुराचे लोट उठताना दिसत आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. आपत्कालीन पथकेही तातडीने तैनात केली जात आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे. केंद्र सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू हे विजयवाड्यावरून अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रीय मार्गावर जाणारे विमान असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर इंधन भरलेले होते. त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली आहे. अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

