
रत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास येत्या २० जूनपासून सुरू होत आहे. यंदाचा ठेववृद्धी मास राष्ट्रप्रेमाला समर्पित असेल, अशी घोषणा स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. ठेववृद्धी मासात जेवढे ठेवीदार संस्थेमध्ये ठेव गुंतवतील, त्या प्रत्येक ठेवीदारामागे संस्थेच्या वतीने २५० रुपये भारतीय सैन्याला निधी म्हणून प्रदान केले जाणार आहेत. त्यामुळे दर वर्षीप्रमाणेच यंदाही जास्तीत जास्त ठेवीदारांनी संस्थेत ठेवी ठेवण्याचे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्था दर वर्षी ठेववृद्धी मास जाहीर करते. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार ठेववृद्धी मासात गुंतवणूक करतात. पतसंस्थेच्या ठेवी आता ३५० कोटी रुपयांच्या झाल्या असून, २० जून २०२५पासून सुरू होणाऱ्या यंदाच्या ठेववृद्धी मासाच्या माध्यमातून ठेवींमध्ये लक्षणीय वाढ होईल. या वर्षीचा ठेववृद्धी मास राष्ट्रप्रेमाला समर्पित असणार आहे. राष्ट्रप्रेमाची प्रखर भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. सहकारी चळवळसुद्धा राष्ट्रीय भावनेचा सन्मान करते. भारताची संरक्षण दले आणि त्यांनी बजावलेल्या देदीप्यमान कामगिरीपुढे नतमस्तक होतानाच आपल्या अर्थकारणातून ठरावीक निधी या संरक्षण खर्चासाठी योगदान म्हणून देणे, ही स्वरूपानंद पतसंस्थेसाठी गौरवांकित होण्यासारखी बाब आहे, असे ॲड. पटवर्धन यांनी म्हटले आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
ठेववृद्धी मासात जेवढे ठेवीदार नव्याने ठेव गुंतवतील, त्या प्रत्येक ठेवीदारामागे २५० रुपये बाजूला ठेवले जातील. ठेववृद्धी मास संपल्यानंतर संस्थेच्या सोशल वेल्फेअर निधीतून २१ जुलै २०२५ रोजी त्या एकत्रित रकमेचा धनादेश शासकीय यंत्रणेमार्फत संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द केला जाईल, अशी माहिती ॲड. पटवर्धन यांनी दिली.
सहकार चळवळीत फार मोठी ताकद सामावलेली आहे. सहकार चळवळीमधून भांडवल निर्मितीही मोठ्या प्रमाणावर करता येते, हे स्वरूपानंद पतसंस्थेने आपल्या उदाहरणातून सिद्ध केले आहे. सहकारातील ही ऊर्जा राष्ट्रासाठी सकारात्मक मार्गाने वापरता येण्यासाठीचे हे छोटेसे योगदान ठरेल; पण हा संस्कार महत्त्वाचा आहे. आजपर्यंत जे ठेवीदार संस्थेकडे विश्वासाने ठेव गुंतवत आले आहेत त्या आणि नव्याने गुंतवणूक करणार आहेत अशा सर्वांना पतसंस्थेच्या माध्यमातून या राष्ट्रीय कार्यात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ठेवीदारांनी या ठेववृद्धी मासात स्वरूपानंदमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

