रत्नागिरीच्या राजापूर तालुक्याला पावसाने झोडपले…

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. राजापूर तालुक्याला काल (१३ जून) संध्याकाळनंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. हवामान विभागाच्या नोंदीनुसार सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजापूर तालुक्यात ११९.८७ मिलिमीटर पाऊस झाला. राजापूर तालुक्यातल्या आडिवऱ्याच्या प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या आवारात पाणी शिरलं. आडिवरे महाकाली मंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरात गेल्या ४० वर्षांत अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. संध्याकाळी सहा ते रात्री १० या वेळेत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आडिवऱ्याच्या मुख्य रस्त्यावर जवळपास १० फूट उंचीपर्यंत पाणी साचलं आणि रस्त्यावरच्या खाद्यपदार्थ विक्रीच्या काही हातगाड्या वाहून गेल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. रस्त्याशेजारच्या दुकानांमध्येही पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचं नुकसान झालं. एकंदरीतच जनजीवन विस्कळीत झालं आहे. धाऊलवल्लीत पावसामुळे डोंगरावरची माती रस्त्यावर आली असून, झाडं पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

रत्नागिरी तालुक्यात ७७.५५ मिमी, लांज्यात ५८.६० मिमी, संगमेश्वरमध्ये ५१.९१ मिमी, खेडमध्ये ४८.५७ मिमी, दापोलीत ४७.५७ मिमी, मंडणगडमध्ये ३१.७५ मिमी, चिपळूणमध्ये २५.५६ मिमी, तर गुहागरमध्ये २२.८० मिमी पावसाची नोंद झाली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply