कॉम्रेड मॅरेथॉनमधील धावपटू प्रसाद देवस्थळी यांचे रत्नागिरीत जोरदार स्वागत

रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करून रत्नागिरीत परत आलेले धावपटू, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांचे शुक्रवारी, दि. १३ जून रत्नागिरीच्या प्रवेशद्वारी स्वागत करण्यात आले.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनची टीम आणि रत्नागिरीकरांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. अहमदाबाद विमान अपघात व मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहून व स्वागताची दुचाकी फेरी रद्द करून रत्नागिरीकरांनी समाजभान राखले.

साळवी स्टॉप येथे शहराच्या प्रवेशद्वारापाशी अॅथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी संदीप तावडे, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध यांनी प्रसादचे पुष्पगुच्छ देऊन आणि पुष्पहार घालून अभिनंदन केले.

मनोगत व्यक्त करताना प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले की, आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये २२ हजार स्पर्धक धावतात. त्यात १६ हजार आफ्रिकेतील असतात. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. आपणही कोकणात कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आयोजित करतो. ती यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घरातील एका व्यक्तीने धावायला पाहिजे तसेच परदेशांतूनही अनेक धावपटू या स्पर्धेसाठी नक्कीच येतील. देशातील विविध ठिकाणच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन त्या अनुभवाच्या आधारे व कोच दादासाो सत्रे यांचे मार्गदर्शन घेऊन मी कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केली. कुटुंबीयांच्या पाठबळामुळेही त्यांचे आभार मानतो. आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, मॅरेथॉनच्या टीमने केलेले स्वागत भारावून टाकणारे आहे. परंतु भीषण विमान अपघातामुळे आजचा कार्यक्रम लहान स्वरूपात करणे म्हणजे समाजभान राखणार शहर असल्याचे लक्षण आहे.

याप्रसंगी कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, संदीप पावसकर, नीलेश शाह, उद्योजिका सौ. कांचन चांदोरकर, सौ. तेजा देवस्थळी, अविनाश फडके, मानसी मराठे, सचिन मराठे, दर्शन जाधव, विनायक पावसकर, आशीष पावसकर, डॉ. नितीन सनगर, महेश सावंत, अॅड. सचिन नाचणकर, गजानन भातडे, नारायण पाटोळे, ओंकार फडके, सौ. दीप्ती फडके, अभिजित पड्याळ, प्रशांत आचार्य, हृषिकेश पुरोहित, हमाल पंचायतीचे पदाधिकारी, सदस्य आदींसह अनेकजण उपस्थित होते.

प्रसाद देवस्थळी यांचे रत्नागिरीत जोरदार स्वागत

प्रसाद देवस्थळी, डॉ. तेजानंद गणपत्ये यांची कामगिरी

दक्षिण आफ्रिकेत गेल्या रविवारी, दि. ८ जून रोजी पार पडलेल्या जागतिक कीर्तीच्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचे प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणचे डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी यशस्वी सहभाग नोंदवून रत्नागिरीचा झेंडा फडकवला. सुमारे ९० किलोमीटर अंतराची ही अल्ट्रा मॅरेथॉन या दोघांनीही सुमारे ११ तास ३० मिनिटांत पूर्ण केली.

कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वांत जुनी व प्रतिष्ठित अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. स्पर्धेचे यंदाचे हे ९८ वे वर्ष होते. पिटर्समारीबर्ग ते डर्बन हे सुमारे ९० किलोमीटरचे अंतर १२ तासांच्या मर्यादेत पार करणे ही या स्पर्धेची अट होती. ५ अंश सेल्सियसपासून २२ अंश सेल्सिअसपर्यंतच्या बदलत्या तापमानात, खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून आणि अनेक चढ-उतार, अडथळे पार करत प्रसाद देवस्थळी आणि डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी कर्करोगावर मात केलेली असून, त्यांनी यापूर्वी दोन वेळा ‘आयर्नमॅन’ किताब पटकावला आहे. ही फिटनेसचा कस पाहणारी स्पर्धा असते. सायकलिंगमध्येही त्यांनी ‘सुपर रँडोनेअर’ हा मानाचा किताब मिळवला आहे.

प्रसाद देवस्थळी हे संगमेश्वर तालुक्यातील धामापूर गावचे सुपुत्र. ‘धावनगरी रत्नागिरी’ अशी ओळख प्रस्थापित करणारे देवस्थळी हे केवळ मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजक नाहीत, तर स्वतःही देशभरातील विविध मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नियमितपणे भाग घेत असतात. यंदा प्रथमच त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. रत्नागिरीतून या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारे प्रसाद देवस्थळी हे बहुधा पहिलेच धावपटू असावेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply