रोरोचा प्रयोग : उपयुक्त आणि फसलेला

मुंबईतून कोकणात येण्यासाठी अनेक पर्यायांप्रमाणेच रो-रोचे दोन प्रयोग गणेशोत्सवाच्या काळात साकारण्यात आले. रेल्वे आणि जलवाहतूक या दोन माध्यमांमधून हे प्रयोग साकारण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम, त्यातूनही एसटी आणि खासगी वाहतुकीवर पडणारा ताण आणि कोकण रेल्वेच्या प्रवासी वहनक्षमतेच्या मर्यादा या पार्श्वभूमीवर हंगामात कोकणात येण्यासाठी पर्यायी मार्गाची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यातूनच रेल्वे आणि जलवाहतुकीच्या पर्यायांची चाचपणी करण्यात आली. त्यापैकी जलवाहतुकीचा प्रयोग प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेचा पर्याय मात्र तूर्त तरी पूर्णपणे फसलेला आणि अव्यवहार्य ठरला आहे.