रोरोचा प्रयोग : उपयुक्त आणि फसलेला

मुंबईतून कोकणात येण्यासाठी अनेक पर्यायांप्रमाणेच रो-रोचे दोन प्रयोग गणेशोत्सवाच्या काळात साकारण्यात आले. रेल्वे आणि जलवाहतूक या दोन माध्यमांमधून हे प्रयोग साकारण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम, त्यातूनही एसटी आणि खासगी वाहतुकीवर पडणारा ताण आणि कोकण रेल्वेच्या प्रवासी वहनक्षमतेच्या मर्यादा या पार्श्वभूमीवर हंगामात कोकणात येण्यासाठी पर्यायी मार्गाची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यातूनच रेल्वे आणि जलवाहतुकीच्या पर्यायांची चाचपणी करण्यात आली. त्यापैकी जलवाहतुकीचा प्रयोग प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेचा पर्याय मात्र तूर्त तरी पूर्णपणे फसलेला आणि अव्यवहार्य ठरला आहे.
मुंबई आणि कोकणाचे जवळचे नाते निर्माण व्हायला जी काही अनेक कारणे आहेत, त्यापैकी अत्यंत स्वस्त असलेली जलवाहतूक हे महत्त्वाचे कारण होते. कोकणातील विविध बंदरांमधून जलवाहतुकीची सेवा उपलब्ध होती. तेव्हा बंदरे गजबजली असायची, किंबहुना नंतरच्या काळात एसटीच्या बसस्थानकांना जे महत्त्व प्राप्त झाले, तीच गरज तेव्हा बंदरांच्या माध्यमातून पुरविली जात होती. खासगी गाड्या, बैलगाड्या आणि टांग्यासारखी वाहने त्या त्या बंदरांपर्यंत पोहोचत असत. तेथून पुढे मुंबईचा प्रवास बोटीने होत असे. मुंबईत भाऊच्या धक्क्यावर उतरल्यानंतर चाकरमानी आपापल्या सोयीच्या व्यवस्थेने आपापल्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचत असत. जलवाहतूक बंद पडल्यानंतर ती जागा एसटीने घेतली. गावोगावी एसटीच्या गाड्या सुरू झाल्या. गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या काळात थेट वाड्यावस्त्यांपर्यंतही एसटीच्या गाड्या पोहोचू लागल्या. कालांतराने कोकण रेल्वे सुरू झाली. एसटीचे अनेर प्रवासी रेल्वेचा वापर करू लागले. पण गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि उन्हाळी हंगामात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना ही सारीच व्यवस्था अपुरी ठरू लागली. म्हणूनच विविध पर्यायांचा विचार केला जाऊ लागला. त्यापैकी मुंबईतून रत्नागिरी आणि विजयदुर्ग बंदरावर उतरण्यासाठी रो-रो बोटसेवेची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली. मुंबई ते अलिबाग मार्गावर यापूर्वीच अशी रो-रो म्हणजेच एम टू एम सेवा सुरू असल्यामुळे त्या सेवेचा विस्तार करणे, त्यादृष्टीने पाहणी करणे एवढेच काम बाकी होते. ते मार्गी लागले. आता लवकरच नियमित वाहतूक होऊ शकेल. विशेष म्हणजे ती सेवा प्रवाशांना परवडणारी असेल.
कोकण रेल्वेने प्रायोगिक स्वरूपात राबवलेली प्रवासी वाहनांच्या रो-रोची वाहतूक मात्र पूर्णपणे फसलेली आहे अवघ्या पाच हौशी प्रवाशांची हौस भागविल्यानंतर तो प्रयोग बंद पडला. कारण तिकीटदर, वाहतुकीसाठी लागणारा वेळ, अत्यंत गैरसोयीचे आणि अवघे दोनच थांबे अशा अनेक कारणांमुळे ती सेवा अत्यंत अव्यवहार्य ठरली आहे. मोठा गाजावाजा करून ती सेवा सुरू करण्यात आली होती, पण सेवेची आखणीच अत्यंत अयोग्य पद्धतीने झाल्याने रो-रोचा रेल्वेचा प्रयोग फसला. या सेवेचा उपयोग करणाऱ्या प्रवाशांनीही परतीसाठी त्या सेवेची निवड केली नाही. ट्रक वाहतुकीच्या रो-रो सेवेचा अनुभव गाठीशी असला तरी ट्रकची वाहतूक आणि प्रवासी मोटारींची वाहतूक यामध्ये कितीतरी फरक आहे, या साध्या गोष्टीकडेच दुर्लक्ष झाल्यामुळे सेवा अव्यवहार्य ठरली. मुळात मोटारींच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेची आवश्यकताच नाही. शक्य त्या प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडीला किमान काही ठरावीक मोटारी नेण्याची सोय, अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर मोटारी उतरविण्याची सोय आणि या मोटारीसोबत येणाऱ्या किमान पाच प्रवाशांची आसनव्यवस्था केली गेली पाहिजे. अशी व्यवस्था केली तर प्रवाशांना परवडणाऱ्या दरात कोकण रेल्वेला सेवा उपलब्ध करून देता येऊ शकेल. ही सेवा प्रवाशांना आणि कोकण रेल्वेलाही परवडू शकेल. आताचा प्रयोग फसला तरी त्या दृष्टीने नव्याने विचार करायला काहीही हरकत नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ५ सप्टेंबर २०२५)
    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply