उकडीचे मोदक हा गणपतीचा अत्यंत आवडता पदार्थ. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात हा पदार्थ घरोघरी केला जातो. या नेहमीच्या मोदकांसोबतच काही वेगळ्या मोदकांच्या पाककृतीही पाहू या. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
नेहमीच्या उकडीच्या मोदकांची रेसिपी :
साहित्य : पारीसाठी : एक वाटी तांदळाचे पीठ, एक वाटी पाणी, एक चमचा तेल किंवा तूप, चिमटीभर मीठ.
सारणासाठी : दोन वाट्या ओले खोबरे, दीड वाटी गूळ, एक चमचा खसखस, अर्धा चमचा वेलची पावडर, थोडे जायफळ, काजू, बदाम (किसून)
कृती : आधी सारणाची कृती पाहू या. एका कढईत ओले खोबरे घालून, त्यात गूळ घालावा. मिश्रण चांगले परतून घ्यावे आणि त्यात खसखस भाजून घालावी. मिश्रण पाच ते १० मिनिटे परतल्यानंतर त्यात किसलेले काजू/बदाम, वेलची पावडर आणि जायफळ घालावे. हे झाले सारण तयार.एका पातेल्यात पाणी घेऊन पाण्यात तेल/तूप घालून चांगले उकळून घ्यावे. उकळी आल्यावर गॅस बंद करून तांदळाचे पीठ घालून ढवळावे आणि वर झाकण ठेवावे. १०-१५ मिनिटांनी पीठ परातीत काढून घ्यावे आणि हाताला तेल किंवा पाणी लावून चांगले मळून घ्यावे. या मळलेल्या पिठापासून पाऱ्या तयार कराव्यात आणि त्या पारीत सारण भरून मोदक करावेत. हे मोदक १५-२० मिनिटे वाफवावेत. हळदीच्या पानावर ठेवून वाफवल्यास चांगला स्वाद येतो.

वेगळे मोदक :
नेहमी केल्या जाणाऱ्या उकडीच्या मोदकांसाठी वापरले जाणारे पीठ आणि सारणात बदल केल्यास वेगळ्या पद्धतीचे मोदकही करता येतात. ते दिसायला आणि चवीलाही छान होतात. साध्या तांदळाच्या पिठाऐवजी गावठी, लाल तांदळांचे पीठ वापरल्यास लाल रंगाचे मोदक तयार होतात. लाल हा गणपतीचा आवडता रंग असल्याने त्याच्या नैवेद्यासाठी लाल मोदक केल्यास त्याच्या आवडीचा पदार्थ आणि रंग यांचे चांगले काँबिनेशन होईल. गोड सारणाऐजी ओले खोबरे, मीठ, मिरची, कोथिंबीर वापरून तिखट सारणही करता येते. ते वापरून केलेले तिखट मोदकही चवीला छान लागतात. सुके खोबरे, खसखस, खारीक, खडीसाखर, खजूर हे पाच घटक पदार्थ म्हणजेच पंचखाद्य वापरूनही चांगले मोदक करता येतात. हे मोदक गव्हाच्या पिठापासून म्हणजेच कणकेपासून करतात आणि त्यात सारण म्हणून पंचखाद्य वापरले जाते. आणि ते वाफवण्याऐजी तळून केले जातात.
टिप : मोदकांसाठीचे पीठ तयार करण्याकरिता तांदूळ धुवून घेऊन वाळवून घ्यावेत. ते वाळल्यानंतर दळून आणावेत. विशेषतः, लाल तांदळांच्या पिठाचे मोदक करायचे असतील, तर ते धुवून, वाळवून मगच त्यांचे पीठ करावे लागते. तसे केले नाही, तर मोदक फुटतात.
(माहिती आणि व्हिडिओतील सहभाग : सौ. अनुप्रीती कोनकर)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड