‘सुक्यो गजाली’ निःशब्द

सावंतवाडीतले ज्येष्ठ पत्रकार आणि माझे ज्येष्ठ सहकारी अरविंद शिरसाट यांचं रविवार, २३ ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं. त्यांची माझी सततची भेट होत नसली तरी सुमारे पस्तीस वर्षांचा संपर्क आता समाप्त झाला आहे.

मी `मुंबई सकाळ`मध्ये असताना एका पत्रकारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांची-माझी पहिल्यांदा भेट झाली. मी माणगावचा, म्हणजे सावंतवाडीजवळच्या गावातला आहे, हे त्यांना तेव्हा समजलं आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क सुरू झाला. तो खूप दाट नसला तरी जवळिकीचा होता, हे नक्की. पंचवीस वर्षांपूर्वी मी मुंबईत सोडून रत्नागिरीत आलो त्यानंतर मात्र त्यांचा संपर्क होऊ लागला. `सकाळ`ची रत्नागिरी जिल्हा आवृत्ती तेव्हा मुंबईच्या कार्यकक्षेत होती. ती २००१ साली कोल्हापूरला जोडली गेली. त्यानंतर कोल्हापूरला होणाऱ्या संपादकीय बैठकांच्या निमित्ताने शिरसाट यांच्याशी संपर्क वाढला. तो अखेरपर्यंत टिकून राहिला.

सुरुवातीच्या काळात गणिताचे क्लासेस घेणारे शिरसाट १९८५ च्या सुमारास `सकाळ`चे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. `सकाळ`च्या कोल्हापूर आवृत्तीचे तत्कालीन संपादक आणि नंतरच्या काळात `सकाळ`चे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्याशी त्यांचे घनदाट संबंध होते. त्यामुळे श्री. कुवळेकर  यांच्याविषयी त्यांना नितांत आदर होता. त्याचबरोबर पत्रकारितेमधल्या अनेक गोष्टी श्री. कुवळेकर यांच्यामुळेच आपण करू शकलो, असं त्यांच्या बोलण्यातून सातत्याने येत असे. `सकाळ`मध्ये असताना त्यांची पत्रकारिता चांगलीच बहरली. ते उत्कृष्ट छायाचित्रकार होते. एक छायाचित्र एक हजार शब्दांचं काम करतं, असं पत्रकारितेच्या बाबतीत म्हटलं जातं. अशी हजारो शब्दचित्र शिरसाट यांनी आपल्या कारकिर्दीत रेखाटली.

त्यांची पत्रकारिता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीच्या सुमारासच सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तो चालताबोलता माहितीकोशच होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मालवणी भाषा, दशावतारी नाट्यकला, जिल्ह्यातल्या परंपरा, पर्यटनाची आणि ऐतिहासिक ठिकाणं याविषयी त्यांच्याकडे साद्यंत आणि परिपूर्ण माहिती होती. तो त्यांचा व्यासंग होता. त्यांचं वाचनही चौफेर होतं. राजकारणाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखादा प्रकल्प, मच्छीमारी, बंदर अशा विविध क्षेत्रातल्या नव्या उद्योगांची घोषणा झाली, की त्याचे जागतिक आणि देशपातळीवरचे संदर्भ देत असत. ते अधूनमधून बातम्यांमधून, वार्तापत्रांमधून प्रकट होत असे. त्यामुळे वाचकांना त्या प्रकल्पाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळत असे. राजकीय घडामोडींचं चांगलं ज्ञान त्यांच्याकडे होतं. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता ते परखडपणे आपली मतं व्यक्त करत असत. नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं अत्यंत आक्रमक असं राजकीय नेतृत्व आहे. त्यांचे कार्यकर्ते सोडाच पण पत्रकार आणि शासकीय अधिकारी-कर्मचारीही त्यांना वचकून असायचे. त्यांच्याविषयीची एखादी बातमी लिहिताना अनेक पत्रकारांचे हात तेव्हा कापत असत. एखादी विरोधातली बातमी छापली गेली तर राणे साहेब रागावतील, अशी भीती पत्रकारांना वाटत असायची. शिरसाट यांनी मात्र कधीही कसली भीती बाळगली नाही. अनेक बाबतीत नारायण राणे यांना अडचणीचे असले तरी थेट प्रश्न शिरसाट विचारत असत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी, राजकीय भवितव्याविषयी लिहिताना शिरसाट यांनी स्वतःला जे वाटतं, ते परखडपणे लिहिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोणत्याही भागातल्या प्रथा आणि परंपरा त्यांना माहीत होत्या. जिल्ह्यातल्या रानावनांची त्यांना माहिती होती. पक्षी, प्राणी, वेगवेगळ्या वनस्पती दुर्मिळ वनस्पती यांची छायाचित्रं काढतानाच त्याची परिपूर्ण माहितीही त्यांनी संकलित केली होती. ती त्यांनी कधीही स्वतःकडे ठेवली नाही. जे समजलं, कळलं ते लगेच लिहून टाकलं. पण ते त्यांनी पुस्तकरूपात कधीही संकलित केलं नाही.  त्यामुळे एक मोठा ठेवा त्यांच्याबरोबर इतिहासजमा झाला आहे. अर्थातच त्यांच्याकडच्या कात्रणांमधूनही खूप काही मिळू शकतं. पुढच्या काळात ते कोणीतरी करावं लागेल. त्यांनी लिहिलेल्या अनेक बातम्या थोडासा बदल करून आजही जशाच्या तशा जुन्या संदर्भासह लिहिल्या जात आहेत. यावरून त्यांची पत्रकारिता कशी होती, हे लक्षात येऊ शकेल. महानगरांमध्ये त्यांनी पत्रकारिता केली असती, तर त्याचं मोठं चीज झालं असतं. शिरसाट आणि मी एकाच वेळी `सकाळ`मधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी नोकरीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांची गडचिरोलीला बदली झाली होती. सुमारे दीड वर्षं ते गडचिरोलीला होते. त्यांच्या प्रकृतीला तिथलं वातावरण मानवलं नाही. तब्येतीच्या तक्रारी सुरूच होत्या. त्यामुळे त्यांना स्वेच्छानिवृत्तीशिवाय पर्याय राहिला नाही.

मालवणी भाषेवर शिरसाट यांचं निरतिशय प्रेम होतं. या भाषेतल्या खाचाखोचा, लकबी त्यांना माहीत होत्या. कुणाशीही बोलताना ते पटकन मालवणीत बोलायला सुरुवात करत असत. मालवणी माणसाचं प्रतिबिंब प्रकट करणारा त्यांच्या `सुक्यो गजाली` या नावाचं खूप लोकप्रिय होतं. ताजे संदर्भ, घडामोडींवरही त्यात मार्मिक आणि चुरचुरीत भाष्य असे. त्याबरोबरच इतिहासातही ते डोकावत असत. `सकाळ`मधून स्वेच्छानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी `गोवन वार्ता` या दैनिकासाठी सावंतवाडीतून काम केलं. त्या दैनिकातही त्यांनी काही काळ हे सदर चालविलं. गेल्या ३० जून रोजी त्यांनी आर्यमधुर नावाचा ब्लॉग सुरू केला. त्यातून हे सदर पुन्हा सुरू केलं होतं. हे सदर त्यांनी `उडाणटप्पू` या नावाने लिहिलं. त्यात आबा बांबार्डेकर, नंदू इन्सुलकार आणि पेद्रू गोन्साल्विस हे त्यांचे सवंगडी होते. (ही त्यांच्या जवळच्या आणि मोजक्या मित्रांच्या लकबीवर आधारलेली टोपणनावं होती.) अस्सल सिंधुदुर्गचा आणि मालवणीचा बाज राखून विनोदी शैलीतून लिहिलं जाणारं त्यांचं हे सदर त्यामुळेच लोकप्रिय होतं. `टाइम्स ऑफ इंडिया`मधील `यू सेड इट` किंवा `महाराष्ट्र टाइम्स`मधील कसं बोललात! या पॉकेट कार्टूनच्या धर्तीवर लिहिलं जात असलेलं हे सदर होतं. नव्या ब्लॉग वर त्यांनी ५६ चुटके लिहिले होते. शेवटचा चुटका गेल्या २१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला होता. (तो चुटका सोबत दिला आहे.) त्यांच्या या ब्लॉगला त्यांचा लाडका मुलगा आर्यन समर्पक चित्रही रेखाटत असे.  आता त्यांचे ते आबा बांबार्डेकर, नंदू इन्सुलकार आणि पेद्रू गोन्साल्विस हे सवंगडी आपला जिवलग उडाणटप्पूच्या अकाली जाण्यामुळे सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर बसून दुःखातिरेकाचे अश्रू ढाळत असतील! कारण आता सुक्यो गजालीमधला नवा चुटका कधीच प्रसिद्ध होणार नाही!

त्यांच्या परखडपणामुळे अनेक जण त्यांना फटकूनच असत. मात्र अत्यंत लाघवी स्वभावामुळे त्यांच्यात कधी दुरावा आला नाही. गणिताबरोबरच पत्रकारितेतही त्यांनी अनेकांना चांगलं मार्गदर्शन केलं होतं. ते सारेच शिरसाट यांच्या जाण्यानं बसलेल्या धक्क्यातून लवकर सावरतील, असं नाही. अर्थातच त्यांचे कुटुंबीय म्हणजे डॉक्टर पत्नी तसंच जिवापाड प्रेम असलेला मुलगा आर्य आणि कन्या मधुरा यांच्यावर तर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला आहे. त्यांना त्या दुःखातून बाहेर येण्याचं बळ प्राप्त होऊ दे, हीच प्रार्थना.

  • प्रमोद कोनकर, रत्नागिरी
  • ……………….

अरविंद शिरसाट यांचा ब्लॉग

. . . मम देव देव !

आबा बांबार्डेकर, नंदू इन्सुलकार, पेद्रू गोन्साल्वीस आणि मी गणेश दर्शनासाठी बाजारातसून फिरा होतो, निवडणुको तोंडार इल्ले. गणपती येवन विराजमान झाल्लो. चाकरमान्यांचोय ओघ बऱ्यापैकी होतो. तेंच्या स्वागताचे फलक, फ्लेक्स राजकारण्यांनी जयथय आपल्या पक्षातर्फे लायलले. गणपती बघता, बघता हे फलकय आम्ही वाची होतो. अर्थ लाय होतो, समजत नाय तेंचे अर्थ काढी होतो.

विशिष्ट संस्कृत भाषेतलो एक फलक मात्र सगळ्यांचो लक्ष आकर्षित करी होतो. तेच्यार असा कायतरी छापलला,

          त्वमेव माता, पिता त्वमेव।

          त्वमेव बंधु, सखा त्वमेव।

          त्वमेव सर्वम, मम देव देव।

आम्ही सगळे तेचो अर्थ आपापल्या परीन लाय होतो. तितक्यात पेद्रू आराडलो, ‘थांबा, थांबा! मी सांगतय.

 ‘मेल्या, संस्कृत आसा ता! तू काय डोंबाल सांगतलय?’. . . आबान बरो झापल्यान.

 ‘मगे, तू सांग तर!‘ . . . पेद्रून चॅलेंज दितुकच आबाचे आवाज बंद.

 ‘बरा, सांग तर! ‘ . . . आबान नांगी टाकली.

  ‘ह्या, चाकरमानी मतदारांका उद्देशून आसा! तुम्हीच आमचे मायबाप, भावंडा-मित्र पण तुम्हीच!‘  . . . पेद्रूचा भाषांतर.

  ‘ता कोणय सांगीत! फुडच्या ओळीचो अर्थ सांग! ‘ . . . नंदू.

  ‘सांगतय, वायंच धीर धर! ‘ . . . पेद्रू.

  ‘फाटदिशी सांग! ‘ . . . आबा.

 ‘त्वमेव सर्वम म्हणजे तुमचा सगळासोना-नाणा, संपत्ती मम देव देव म्हणजे माका दिया! ‘ . . . पेद्रू.

   ‘पण, देव देव असा दोनदा ख्येका?’ . . . माझी शंका.

   ‘जोर येवच्यासाठी! म्हणजे दियाच! ‘ . . . पेद्रूचा स्पष्टीकरण.

  • उडाणटप्पू

(२१ ऑगस्ट २०२०)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. अतिशय समर्पक आणि वस्तुनिष्ठ विवेचन आहे.श्री शिरसाट यानी जिल्ह्यात आपल्या निरपेक्ष, अभ्यासू आणि बेधडक वृत्तीने पत्रकारीता एका वेगळ्या उंचीवर नेली आहे याचा अभिमान वाटावा जो आजकाल दुरापास्त होत चालला आहे.जिल्हा एका तळमळीच्या पत्रकाराला मुकला असून ही हानी कधीही भरून येणार नाही.

Leave a Reply