ऋषीपंचमीला कंदमुळाची भाजी केली जाते. पूर्वीच्या काळी जंगलात वास्तव्याला असलेल्या ऋषी-मुनींच्या आहारात प्रामुख्याने कंदमुळेच असत. ऋषीपंचमीला केल्या जाणाऱ्या भाजीमागची मूळ संकल्पना तीच आहे. ऋषीपंचमीच्या या भाजीत उपलब्धतेनुसार विविध कंदमूळवर्गीय भाज्या, रानातल्या पालेभाज्या, फळभाज्या आदींचा समावेश असतो. अशा वैविध्यपूर्ण भाज्यांमुळे कंदमुळाच्या या भाजीची चव आणि पौष्टिकता या दोन्ही गोष्टी अप्रतिम असतात. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
साहित्य : अळूची पाने, अंबाडीचा पाला, लाल पालेभाजी, कुर्डू, सुरण, गाजर, अळकुड्या, बीट, बटाटा, फणसाच्या आठळा, भिजवलेले शेंगदाणे, मक्याचे दाणे, पडवळ, भोपळा, दुधी भोपळा, दोडका, भेंडी, भाजलेले शेंगदाणे, खोबरे, जिरे, चिंच, गूळ, मीठ, शेंगदाण्याचे तेल किंवा तूप, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर.

यात पालेभाज्यांचे प्रमाण सर्वांत जास्त हवे आणि भेंडी सर्वांत कमी हवी. उपलब्धतेनुसार या यादीत दिलेल्यांव्यतिरिक्त आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अन्य भाज्या घातल्या तरी चालतात; मात्र उग्र चवीच्या भाज्या घालायच्या असल्यास कमी प्रमाणात घालाव्यात.

स्वच्छ केलेल्या सर्व भाज्या प्रथम चिरून/फोडी करून घ्याव्यात. पालेभाज्या वगळता अन्य सर्व भाज्या मीठ घालून स्वतंत्रपणे शिजवून घ्याव्यात. चिरलेल्या पालेभाज्या शेंगदाण्याचे तेल किंवा तुपावर फोडणीला टाकाव्यात. फोडणीत जिरे आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. सोबत टोमॅटोच्या फोडीही घालाव्यात. ही भाजी परतावी आणि थोडा वेळ पातेल्यावर झाकण ठेवावे. म्हणजे ती शिजेल. त्यानंतर स्वतंत्रपणे शिजवलेल्या बाकीच्या भाज्या त्यात घालाव्यात. सगळे मिश्रण नीट ढवळून घ्यावे. (बाकीच्या भाज्या स्वतंत्रपणे शिजवून न घेता सगळ्या भाज्या थेट फोडणीला टाकल्या तरी चालतात.)
भाजलेले शेंगदाणे, ओले खोबरे आणि चिंचेचा कोळ यांचे मिश्रण करून ते मिक्सरला लावून घ्यावे. हे मिश्रण भाजीत घालावे आणि चांगले ढवळून घ्यावे. सर्वांत शेवटी मीठ आणि गूळ घालावा. पुन्हा एकदा सगळे ढवळून घेऊन एकत्रितपणे शिजू द्यावे. म्हणजे ते मिश्रण एकजीव होईल आणि छान भाजी तयार होईल.
(माहिती आणि व्हिडिओतील सहभाग – सौ. अनघा कोनकर, सौ. अनुप्रीती कोनकर)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड