Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

करोनाच्या काळातील डोळ्यांच्या तपासणीसाठी २५ ते २७ शिबिर

Advertisements

रत्नागिरी : सध्याच्या करोनाच्या काळात ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार आहे, त्यांनी ते योग्य नियंत्रणात राहतील याची संपूर्ण काळजी घ्यायची आहे. असे आजार असलेल्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे येत्या २५ ते २७ जून या काळात विशेष तपासणी शिबिर होणार आहे.

दैनंदिन कितीही काळजी घेतली तरीही बऱ्याच वर्षांपासून शरीरात असणारा मधुमेह आणि अर्थातच रक्तातील अनियंत्रित साखर ही डोळ्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवाचे नुकसान करत असते. मधुमेही रुग्णांमध्ये विशेष करून रक्तातील अनियंत्रित साखरेचा परिणाम म्हणून दृष्टिपटल किंवा रेटिनाला सूज येणे, पडद्यावर रक्तस्राव होणे, पडद्याला छिद्र पडणे यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता काळानुसार उत्पन्न होते. परंतु आपल्या डोळ्यांची रेटिनाच्या तज्ज्ञांकडून मधुमेही रुग्णांनी वर्षातून किमान दोनदा तपासणी करून घेतली, तर या समस्या वेळीच लक्षात येतात. अशा समस्यांवर वेळीच उपचार केले तर रुग्णांचा बराचसा त्रास, पैसा व मधुमेहामुळे होणारा दृष्टिनाश लांबवता येतो किंवा आटोक्यात आणता येतो. मधुमेही रुग्णांनी हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक १५ मधुमेही व्यक्तींपैकी ७ ते ८ जणांना डोळ्यांच्या पडद्याचे आजार व त्यामुळे गंभीर दृष्टिनाश होण्याची शक्यता असते. मधुमेहामुळे होणारा दृष्टिनाश आणि डोळ्यांची हानी कधीही संपूर्णपणाने बरी करता येत नाही, तर ती वेळोवेळी उपचार करून फक्त नियंत्रणात ठेवावी लागते.

इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये ग्रीन लेझर, ३ डायमन्शेनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड ॲनालायझर, अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणा असून याद्वारे रेटिनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तपासणी केली जाते. हा विभाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील एकमवे सुसज्ज विभाग आहे. तेथे येत्या २५ ते २७ जून या कालावधीत इन्फिगोचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत रुग्णांची तपासणी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत करणार आहेत. डॉ. कामत चेन्नईतील शंकर नेत्रालयातील उच्च प्रशिक्षित रेटिना तज्ज्ञ असून त्यांनी आजपर्यंत मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, नागपूर, रांची, लखनौ, पाटणा येथील हजारो रुग्णांवर रेटिनाचे उपचार केले असून २० हजाराहून अधिक डोळ्याच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. पूर्वनोंदणीनुसार त्यांच्याशी रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमधील अपॉइंटमेंट निश्चत करता येईल. नावनोंदणी करण्यासाठी ९३७२७६६५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे कोणाला प्रवासासाठी आवश्यक पत्राची गरज असल्यास नावनोंदणी केल्यावर इन्फिगोकडून प्रवासासाठी आवश्यक पत्र त्वरित पाठवले जाईल, असे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version