डायबेटिस डे/मधुमेह दिवस विशेष
दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक डायबेटिस/मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने डोळे या सर्वांत संवेदनशील अवयवाचा मधुमेहाशी कसा संबंध आहे, याविषयी ऊहापोह.
……………………………….
मधुमेह हा एक धोकादायक आजार असला तरीही मधुमेहाला नियंत्रणात कसे ठेवायचे हे समजले तर तो शेवटपर्यंत आपल्याबरोबर मित्रासारखा राहू शकतो. मधुमेहामध्ये आपला आहार आणि आपल्याला हितकारक अश्या नियंत्रित जीवन शैलीचे निश्चयाने आणि काटेकोरपणे पालन करणे हासुद्धा एक उपाय आहे. सर्वसाधारणपणे आपल्या देशात बारा ते पंधरा टक्के लोकांना डायबेटिस किंवा मधुमेह आहे, असे आढळून आले आहे. म्हणजेच प्रत्येक शंभर लोकसंख्येतील बारा ते पंधरा व्यक्तींना मधुमेह असतो, तर त्यापैकी सात ते आठ जणांना दीर्घकालीन मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्याचे आजार होण्याची आणि परिणाम म्हणून संपूर्णतः किंवा अंशतः दृष्टिनाश होण्याची शक्यता अधिक असते.
दीर्घकालीन मधुमेहामध्ये किंवा विशेषकरून रक्तातील सततच्या अनियंत्रित साखरेच्या प्रमाणाने डोळ्यांच्या पडद्यावर गंभीर परिणाम झालेला दिसून येतो. यामध्ये डोळ्यांच्या पडद्याला सुज येणे, पडद्याला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या कमकुवत होऊन रक्तस्राव होणे किंवा पडद्याला छिद्र पडणे यासारख्या गंभीर समस्या आणि लक्षणे उद्भवणेच इत्यादींचा समावेश आहे. विशेषतः मधुमेही व्यक्तींना या गोष्टी उशिरा लक्षात आल्याने डोळ्यांच्या दृष्टीला आधीच बाधा पोहोचलेली असते आणि त्यामुळे काही प्रमाणात नष्ट झालेली दृष्टी रेटिना स्पेशालिस्टकडून पडद्याच्या विशिष्ट तपासण्या केल्याशिवाय बहुतेक वेळेस लक्षात येते नाही. बहुतेक वेळेला असे आढळून आले आहे की मधुमेहामुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण झालेल्या व्यक्ती डॉक्टरांना जेव्हा दाखवतात, तेव्हा हे आजार दुसऱ्या स्थितीत (secondary stage) पोहोचलेले असतात. त्यामुळे डॉक्टरांकडे येण्यापूर्वीच दृष्टीला काही बाधा झालेली असते. एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मधुमेहामुळे काही प्रमाणात नष्ट झालेली दृष्टी कोणतेही उपचार करून संपूर्णतः परत येत नसल्याने आपल्या डोळ्यांची वर्षातून दोन वेळेला आपल्याला काही समस्या असो अगर नसो, रेटिना स्पेशालिस्टकडून पडद्याची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. रेटिना स्पेशालिस्ट मधुमेही व्यक्तींची डोळ्यांत औषधाचे थेंब घालून ( Dialated Eye Exam) पडद्याची स्लिट लॅम्पद्वारे तपासणी करतो किंवा रेटिनोस्कोपी करतात. त्यांना आवशक्यता भासल्यास (oct) पडद्याची स्थिती पाहण्यासाठी डोळ्यांचे स्कॅन किंवा B Scan यांसारख्या तपासण्या केल्या जातात. यामुळे पडद्याच्या संबंधित आजाराचे वेळीच निदान करणे शक्य होते आणि संभाव्य दृष्टिनाश नियंत्रणात ठेवता येतो. मधुमेही व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की दृष्टी व्यवस्थित असेल तर आपल्या स्वावलंबी आयुष्य अभिमानाने जगता येते. त्यामुळे डोळ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन पडद्याची तपासणी करणे आवश्यक आहे.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांची तपासणी केल्यानंतर चष्म्याचा नंबर बदलला असेल किंवा नवीनच चष्मा लागला असेल तर तपासणी करण्याच्या किंवा चष्मा घेण्याच्या दिवशी रक्तातील साखरेची पातळी संपूर्णतः नॉर्मल असली पाहिजे. चष्म्याचा नंबर काढल्याच्या दिवशी रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असेल तर असा नंबर चुकण्याची शक्यता असते. परिणामी असा निवडलेला चष्मा चुकीचा वा त्रासदायक असतो.
मधुमेही व्यक्तींनी आपला आहार आणि जीवनशैली, शिस्त आणि योग्य प्रमाणात व्यायाम आणि सहाय्यक म्हणून निश्चित वेळेवर नियमित रीतीने औषधे घेणे या सर्वांचा परिणाम म्हणून आयुष्य सुरळीत आणि फारशा तक्रारी न करता जगता येते. मधुमेही व्यक्तींना मोतीबिंदू असल्यास मोतीबिंदू काढून टाकल्यावर त्याजागी बसवल्या जाणाऱ्या लेन्सची निवड डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आणि अचूक करावयाची असते. तरच अपेक्षित परिणाम साध्य होऊ शकतो. मधुमेह हा आपला मित्र असल्याने त्याला समजून घेऊन त्याच्या बरोबर राहणे सुखाचे ठरते.
विशेष आवाहन :
मधुमेहींसाठी सुसज्ज असा अत्याधुनिक रेटिना विभाग, पडद्याचा खास 3D OCT स्कॅन, मास्टर आय चेक अप, बी स्कॅन आणि पडद्याच्या सर्व अवघड शस्त्रक्रिया रत्नागिरीत फक्त इन्फिगोमध्ये उपलब्ध आहेत. मधुमेह असणाऱ्यांसाठी १५ ते २५ नोव्हेंबर २०२१ या काळात इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये येथे कॉम्प्रिहेन्सिव्ह फंड्स आय चेक अपची मोफत तपासणी केली जाणार आहे. त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आव्हान इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.