दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारकाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १४ जानेवारीपासून वाचक कट्ट्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
हा वाचक कट्टा महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत असेल. दापोली तालुक्यातील पहिल्या वाचक कट्ट्याचे आयोजन उद्या सायंकाळी पाच वाजता जालगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारकात करण्यात आले आहे. खेड येथे पां. वा. काणे स्मारक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खेड शाखेतर्फे समितीचे कार्याध्यक्ष विमलकुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पूज्य साने गुरुजी स्मारक वडघर माणगाव (जि. रायगड) येथे समितीचे उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.
या वाचक कट्ट्यावर वाचकांनी आवर्जून उपस्थित राहून आपण वाचलेली पुस्तके, कविता, स्फुट किंवा कोणत्याही वर्तमानपत्रातील मजकुरावर बिगरराजकीय भाष्य करू शकतील. या विशेष कार्यक्रमाला वाचकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.

