लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेजारीच असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडापेक्षा अधिक उंची लाभलेले हे गाव अजूनही दुर्गम आहे. गावात स्वातंत्र्यांच्या सत्तर वर्षांनंतर तीन वर्षांपूर्वी रस्ता पोहोचला. त्यामुळेच आता या गावातील पर्यटन बहरावे, या हेतूने राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने गावात प्रथमच सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले होते. गावातील शतायुषी जोडपे सखाराम रावजी भातडे आणि लक्ष्मीबाई सखाराम भातडे यांचे औक्षण त्यांच्या घरापासून समारंभाच्या स्थळापर्यंत घोडागाडीतून सवाद्य मिरवणूक काढून महोत्सवाचा प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना रंगमंचावर सन्मान करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आणि गावातील तरुणांना रोजगारासाठी आवश्यक ती मदत जिल्हा बँकेकडून करण्याचे आश्वासन दिले. कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव म्हणाले की, माचाळ हे रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे, तर कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक ती तयारी सर्वांच्या सहकार्याने करू. गावातील जमिनी कोणीही विकू नयेत, गावाचे वैशिष्ट्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले. संजय यादवराव म्हणाले की, कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याचे आश्वासन अनेक वेळा दिले जाते. पण त्यापेक्षा कोकण समृद्ध आहे. कॅलिफोर्नियामध्ये १०० किलोमीटर फिरल्यानंतर १० झाडे दिसतात. पण कोकणात अगदी माचाळमध्येही देवराईत १०० मीटर फिरलो, तर १० हजार झाडे दिसतील. निसर्गाने हीच समृद्धी कोकणाला दिली. म्हणूनच कोकण सर्वांत श्रीमंत आहे. ती श्रीमंती दाखवायची असेल, तर गावे मूळ स्वरूपात शिल्लक राहिली पाहजेत. माचाळवासीयांनीही मातीची घरे तोडू नयेत. पारंपरिक घरे म्हणून पर्यटकांना तेथे राहण्याची व्यवस्था करता येईल, असे त्यांनी सांगितले. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर म्हणाले की, माचाळला भेट देणारे आणि माचाळच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा दृष्टिकोन असलेले पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आता पर्यटन संचालक म्हणून मंत्रालयात काम पाहत आहेत. त्यांच्याकडून माचाळच्या पर्यटनाच्या विकासासाठी काहीतरी चांगले करता येईल.
सामाजिक प्रदूषण ही सध्याच्या समाजातील सर्वांत मोठी समस्या असल्याचे सांगून पर्यटनाचे अभ्यासक धीरज वाटेकर म्हणाले की, सामाजिक प्रदूषण नसलेले आणि ते वातावरण टिकविण्याचे काम माचाळसारखी गावे करत आहेत. तीच वेगळ्या पर्यटनाचा दूत म्हणून काम करणार आहेत. युयुत्सु आर्ते, लांज्याचे माजी नगराध्यक्ष सुनील ऊर्फ राजू कुरूप, नितीन कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.
जागतिक पौष्टिक अन्नधान्य वर्षाचे औचित्य साधत माचाळ गावात घेतल्या जाणाऱ्या नागलीच्या पिकापासून विविध पदार्थ बनवून लांज्यातील सुहासिनी सार्दळ यांनी ते सादर केले. माचाळवासीयांनी नाचणीचे ब्रॅंडिंग करून अर्थार्जनाचा मार्ग शोधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गोविंद मांडवकर आणि सहकाऱ्यांचे डफावरचे गाणे, माचाळच्या महिला मंडळाची हाताची फुगडी, शाहीर रूपेश मांडवकर आणि सहकाऱ्यांचे जाखडी नृत्य, लांज्यातील कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी माचाळ माझे गाव हे गीत, तसेच आदिवासी नृत्य सादर केले.) माचाळने जोपासलेली सापड लोककला गावकरी पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली माचाळवासीयांनी सादर करून महोत्सवाला उपस्थित पर्यटकांची मने जिंकली.
राजापूर लांजा नागरिक संघाने प्रकाशित केलेली पुस्तके, कोकणी वस्तू कलादालन, विजय हटकर यांनी निसर्गरम्य माचाळच्या काढलेल्या आणि संकलित केलेली छायचित्रे यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. माझे माचाळ या मुक्त पत्रकार विजय हटकर यांनी लिहिलेल्या पर्यटनपुस्तिकेचे प्रकाशन यावेळी झाले.
सापड लोककला महोत्सवाच्या प्रचारासाठी आलेले यूट्यूबर विकास चव्हाण, माचाळ गावातील घरांच्या मातीच्या भिंती बोलक्या करणारे चित्रकार अजित गोसावी, पर्यटनदूत शहानवाझ सारंग, गिर्यारोहक अरविंद नवाले यांचा यावेऴी सन्मान करण्यात आला.
माचाळसारख्या गावांचे महत्त्व जगाला समजावे, कोकणातील परंपरा, लोककला जोपासल्या जाव्यात, यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने हा महोत्सव आयोजित केला आहे. माचाळमधील पर्यटन वाढीला लावण्याची जबाबदारी माचाळवासीयांनीच घ्यायला हवी, अशी अपेक्षा संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी समारोप करताना व्यक्त केली. समारंभाला नगरसेवक नंदराज कुरूप, गावकर पांडुरंग पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय इंदुलकर, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, विजय हटकर, अशोक पाटील, तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर, दीपक नागवेकर, चंद्रकांत खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच देणारे विजय इंदुलकर, दिशादर्शक फलकाचे काम पाहणारे संदीप गुरव, माचाळ महोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे महेंद्र साळवी, प्रकाश हर्चेकर, विनोद बेनकर, दीपक नागवेकर, बंटी गाडे, प्रथमेश मेस्त्री, शुभम नागवेकर, प्रमोदराव पवार, गणेश चव्हाण, मंगेश चव्हाण, विकी पवार यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

