माचाळ : दोनशे वर्षांपूर्वीच्या गावाची जितीजागती प्रतिकृती

जागतिक पर्यटन दिन विशेष

रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचला. त्यामुळे अजून तरी खऱ्या अर्थाने माचाळ पर्यटनसमृद्ध आहे. आता त्या गावाच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. त्यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र ” लोकल टू ग्लोबल माचाळ”च्या या विकासप्रकियेत १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात करून देणारी ‘माचाळची ग्रामीण संस्कृती’ जपायला हवी. कारण माचाळच्या आल्हाददायक, थंड हवेच्या गिरीस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त माचाळच्या पर्यटनाची ओळख करून देणारा लेख.
………

जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, सुप्रसिद्ध संगीतकार सुनील जाधव, संघाच्या पर्यावरण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खामकर यांच्यासोबत लांजा तालुक्यात वसलेल्या माचाळ गावाचा अभ्यासदौरा केला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मिनीमहाबळेश्र्बर संबोधिलेल्या हिलस्टेशनच्या स्वर्गीय निसर्गाची पुन्हा एकदा अनुभूती घेतली.

माचाळ गावात प्रवेश करतानाच आमचे स्वागत करत मुचकुंद ऋषींच्या गुहामार्गाकडे झेपावलेला ग्रेट हॉर्नबिल (राजधनेश किंवा गरूडधनेश) आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला. माचाळच्या पायथ्याशी असलेल्या पालू गावात विजय बेंद्रे नामक पर्यावरणस्नेही तरुण “हॉर्नबिल स्टे फॉरेस्ट होम”ची निर्मिती करत आहे. माचाळमधील दुर्मिळ असलेल्या ग्रेट हॉर्नबिलचा वावर पाहून मी जास्त सुखावलो. मजबूत बाकदार पिवळसर रंगाच्या आकर्षक चोचीच्या या पक्ष्याच्या अधिवासामुळे सह्याद्रीतल्या माचाळ पठारावर दुर्मिळ पक्ष्यांचा असलेला वावर सिद्ध झाला.

साडेतीन हजार फूट उंचीवरील माचाळ गाव कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या विशाळगडापासून एका दरीमुळे वेगळ्या झालेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगेतील सपाट माळरानावर वसले आहे. शिवकाळात ऐतिहासिक खेळणा (विशाळगड) या दुर्गाचा जोडदुर्ग म्हणून त्याची नोंद आहे. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचे रस्ते, परिसरात पूर्णपणे पसरलेले धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टींनी वेढलेले थंड हवेचे माचाळ हे गाव आपल्याला पहिल्या भेटीतच आकर्षित करते.

या गावाला ‘ब’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तसेच गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेल्याने भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे, तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.

गावात पोहोचल्यावर शहरी गोंगाटापासून दूर आल्याची जाणीव होते. गाड्यांचा आवाज, प्रदूषण, माणसांची गर्दी, कामाचा व्याप या सगळ्यापासून दूर..

मुचकुंद ऋषींची गुहा

गावाच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे किमान अर्धा तास चालत गेल्यावर मुचकुंद ऋषींची गुहा लागते. गुहेकडे जाताना वाटेत मुचकुंदी नदीचे उगमस्थान असलेले कुंड आहे. गुहेकडे चालत जाताना पायाल जळू चिकटून रक्त शोषून कधी मोकळ्या होतात, हे कळत नाही. म्हणून चालताना काळजी घ्यावी लागते. महाभारतात क्रोधिष्ट आणि आगीचा गोळा म्हणुन प्रसिद्ध पावलेल्या मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळ गेल्यावर कालिया दानवाला भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद ऋषींद्वारे भस्मसात केले होते. त्या कथेच्या आठवणीला उजाळा मिळतो. या दानवाला ज्या गुहेत मुचकुंद ऋषींनी भस्मसात केले, त्या गुहेचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केला असून तेथे श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींच्या मूर्ती उभारल्या आहेत. तेथे महाशिवरात्रीला होणाऱ्या उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. या ठिकाणावरुन दिसणारे विलोभनीय सौंदर्य आणि सूर्यास्त भुरळ घालतो.

विशाळगड ट्रेकिंग
माचाळ गावातून दक्षिणेकडे घोड्याचा टाप या ठिकाणाहून एक दरी उतरून कोकण दरवाजामार्गे विशाळगडावर पोहोचता येते. त्यासाठी किमान दीड तासाची पायपीट करावी लागते. मात्र हा अनुभव सह्याद्रीच्या रांगड्या रूपाची जाणीव करून देतो.

यासोबतच भिश्याचा कडा ,कोडबन हीदेखील आवर्जून पाहावी,त अशी स्थाने आहेत. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरी स्वर्गात आल्याचा भास होतो. इथल्या पठारावरून खाली पाहिल्यानंतर हजारो फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.

ग्रामीण संस्कृती


माचाळला जोडणारा रस्ता २०२१ मध्ये पूर्ण झाल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळच्या विकासकामाला आता गती येईल. जगापासून आजवर डिस्कनेक्ट असलेले माचाळ जोडण्यास मदत होईल, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षे तेथे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नसल्याने तेथील सात्त्विक, पवित्रतेची अनुभूती देणारा निसर्ग आणि १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकण कसे होते, हे सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती आजही टिकून आहे. गावातील उतरत्या छपराची चौपाखी कौलारू घरांची रचना, आतील मातीच्या जाडजूड भिंती, जुन्या लाकडी चौकटीवर (खांबावर) असलेले आडे, सारवलेल्या भिंती हे सर्व घरे १०० वर्षे जुनी असल्याचा पुरावा देतात. प्रचंड घोंगावणाऱ्या वाऱ्यापासून घरांचे आणि माणसांचे रक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक घर चारही बाजूंनी गवताने कुडलेले आहे. यासाठी गवत आणि कारवीच्या काठ्या यांना बांबूच्या कामठ्यांनी जोडताना वनस्पतीच्या दोरांनी बांधणी केलेली सलटी केली जाते. या सलट्यां घराच्या चारही बाजूंनी लावल्या जातात. पावसाळा आणि हिवाळ्यातील आठ महिन्यांच्या काळात पडत असलेल्या थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून इथल्या प्रत्येक घरात आजही आपल्याला ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘पिरसा’ पाहायला मिळतो. काही घरात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे असे दोन दोन ‘पिरसे’ दिसतात.

माचाळ हे मुचकुंद ऋषींचे गाव असल्याने तेथील ग्रामस्थ आपण ऋषी कुळातील असल्याचे अभिमामाने सांगतात. ऋषींचे कूळ असलेल्या गावात शेतीचे काम करण्यासाठी बैलाचा वापर केला जात नाही. माचाळला ही परंपरा कायम असून तेथील शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी रेड्याचा वापर करतात. ‘रेड्याचे जोते’ हे माचाळचे आणखी एक पारंपरिक वैशिष्ट्य! गावात सुमारे १००-११० घरे असून पाटील, मांडवकर, गोवळकर, भातडे, भिसे, भोसले, निबदे, नामे या आडनावाची कुटुंबे गुण्यागोविंदाने राहतात. माचाळ गावात असलेल्या मध्यवर्ती रस्त्याच्या उजव्या वरच्या बाजूस मांडवकर तर खालच्या बाजूला पाटील आडनावाची कुटुंबे राहतात. ईलर्निंगच्या काळात गावात आठवीपर्यंतच्या शिक्षणाची जेमतेम व्यवस्था असून मुलांना पुढील शिक्षणासाठी साखरपा, लांजा गाठावे लागते. अजूनही तेथे कोणत्याही कंपनीचा टॉवर उभारला गेला नसल्याने मोबाइलला रेंज नाही. पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोबाइल आणि इंटरनेट गरजेचे असले तरी सद्यःस्थितीत धावपळीच्या गतिमान युगात डिस्कनेक्ट जीवनाचा थोडा काळ तेथे आनंद घेता येतो.

माचाळच्या पठारावर ग्रामस्थ मुख्यत्वे गव्हाचे पीक घेतात. सोबत भात, नागली ही पिकेही घेतली जातात. दुर्गमतेमुळे रोजगाराची फारशी संधी नसल्याने ग्रामस्थ तास-दीड तासाची पायपीट करून विशाळगडावर जातात. तेथे दूध, दही, लाकडांची मोळी विकतात. येत्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच माचाळचा कायापलट होणार असल्याने ही परिस्थिती बदलली जाईल. मात्र सद्यःस्थितीत गावातील तरुण उपजीविकेसाठी मुंबई आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये स्थायिक झाले आहेत. पाटील कुटुंबातील तरुण चेन्नईमध्ये सुवर्णव्यवसायात स्थिरावले असल्याचे गणेशोत्सवानिमित्ताने गावी आलेल्या धोंडू पाटील यांनी सांगताच त्यांचे कौतुक वाटले.

एकशेपाच वर्षांचे जोडपे

माचाळला प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य आणि हिरवाई लाभल्याने येथील संघर्षमय जीवनपद्धतीतसुद्धा ग्रामस्थांचे सरासरी आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येते. सरासरी आयुर्मान जास्त असलेले गाव हीदेखील माचाळची ओळख आहे. हिमालयाच्या कुशीत जशी शंभरी पार केलेली माणसे आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे माचाळला थोडेथोडके नव्हे तर तब्बल १०५ वर्षांचे एक जोडपे आहे. सखाराम रावजी भातडे आणि सौ. लक्ष्मीबाई सखाराम भातडे असे त्याचे नाव! त्यांना तीन मुले, तीन मुली, वीस नातवंडे आणि पतवंडे असा भला मोठा परिवार असून या आजी-आजोबांचा उत्साह अजून दांडगा आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी शंभरी ओलांडली आहे, यावर विश्वास बसत नाही. गावातील शिमगा आणि गणेशोत्सवात गेली सत्तर वर्षे सखाराम आजोबा ताशा वाजवण्याचे काम करीत आहेत. यंदा १०५ व्या वर्षीही त्यांनी ही परंपरा मोडलेली नाही. माचाळच्या पर्यावरणीय निरोगीपणामुळेच तेथे दीर्घायुष्य लाभलेली अशी अनेक माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला की जीवन जगण्याचे सोपे तत्त्वज्ञान आपल्यासमोर उलगडते. माचाळ पर्यटनाला आलेल्या पर्यटकांनी १०५ वर्षांच्या या जोडप्याला आवर्जून भेट देऊन त्यांच्या दीर्घायुष्याचे गुपित समजून घेतले पाहिजे. माचाळभेटीत त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह टाळता येत नाही.

वन्यजीवन
माचाळ पठारावर सर्वसाधारणपणे खुरटी आणि कमी उंचीची झाडे दिसतात. आंबा, काजू, फणस अशासारखी कोकणात विपुल असलेल्या झाडांची वाढ माचाळला होत नाही, हे या भूमीचे आणखी एक भौगोलिक विशेष! चार-पाच वेगवेगळ्या उंचीच्या औषधी जांभळाची झाडे तेथे आहेत. तेथील देवराई जपण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला असून कधीही न पाहिलेल्या असंख्य फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या दर्शनाने मनाला एक वेगळेच समाधान मिळते. गावातील डोंगराच्या बाजूने लाल मोठे खेकडे सापडतात. ब्राह्मणी, बेहडा, खारवी, जंगली कढीपत्ता अशा अनेक औषधी वनस्पती विपुल प्रमाणात दिसून येतात.

सापड लोककला


रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरे तर उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावचे मुख्य गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य. या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. माचाळचा गणेशोत्सव आणि सापडनृत्य हे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोल्डन पॅकेज ठरू शकेल.

विविधरंगी फुलपाखरू

गावातील मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात एका दगडावर वाघाचे शिल्प असून याविषयी माहिती घेतली असता डोंगरदऱ्यातील अरण्यपुत्रांची “वाघबारसे” ही परंपरा तेथे साजरी केली जाते.

थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळचा विकास करताना हे सारे वेगळेपण जपावे लागेल. यासाठी माचाळच्या संवेदनाशील पर्यावरणाला हानिकारक ठरेल, अशा गोष्टी सुरवातीपासूनच रोखण्याकडे लक्ष पुरवावे लागेल. रायगड जिल्ह्यातील माथेरान हे संपूर्ण आशियातील एकमेव गिरीस्थान आहे, जेथे खासगी वाहनांना प्रवेश नाही. वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जपल्यानेच आजही माथेरान प्रदूषणमुक्त आहे. त्याच धर्तीवर माचाळची वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जाहीर करावे लागेल. डोंगरी विभागातून माचाळची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी लागेल. गावात रस्ता पोहोचला असला, तरी गावात प्रवेश करण्यापूर्वी लागणाऱ्या सपाट माळरानापर्यंतच खासगी वाहनांना प्रवेश दिला गेला पाहिजे. म्हणजे माचाळचा ग्रामीण बाज जपता येईल. परिणामी माचाळमधील मातीच्या पाऊलवाटांवर पाऊस सुरू झाल्यावर पावसात चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता येईल. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत गारठल्यानंतर गावातील घराघरात असलेल्या पिरशासमोर बसून शेकोटीचा आनंद घेता येईल.

इरले : ग्रामीण लोकजीवनाचे अविभाज्य आयुध

तसेच उन्हाळ्यात साहसी पर्यटनाचे थ्रील अनुभवता येईल. सोबतच माचाळला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करणारे भव्य प्रवेशद्वार उभारून तेथेच लक्षवेधक अशा भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींच्या भव्य पुतळ्यांची निर्मिती करावी लागेल. माचाळला आलेला पर्यटक गावात राहावा, यासाठी येथील कला, संस्कृती जागतिक पर्यटकांसमोर मांडण्यासाठी नियोजित कलामहोत्सवांचे आयोजन करावे लागेल. ग्रामीण संस्कृतीचे आणि येथील स्वर्गीय निसर्गाची अनुभूती देणारे कल्पक संग्रहालय उभारावे लागेल. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर असलेली विविध पर्यटन ठिकाणे पक्क्या पाखाड्या बांधून जोडावी लागतील. स्थानिक तरुणांना माचाळ पर्यटनदूत म्हणून प्रशिक्षण द्यावे लागेल. मुचकुंद ऋषींच्या गुहा परिसरात मुचकुंद ऋषी आणि कालिया असुराचा वध, भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींची भेट हे प्रसंग पर्यटकांसमोर मांडणाऱ्या छोट्याशा चित्ररूप सफर घडवून आणणाऱ्या ‘गिरीस्थान कलाकेंद्राची’ निर्मिती करता येईल. त्यातून ऐतिहासिक, पौराणिक पर्यटनस्थळ म्हणूनही माचाळचा विकास साधता येईल. ‘मुचकुंदी नदी परिक्रमेचा कार्यक्रम आखता येईल. त्याअंतर्गत नदीचे उगमस्थान सहलीच्या माध्यमातूनही पर्यटकांसमोर मांडता येईल. माचाळला गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, राफ्टिंगसारखे साहसी खेळ सुरू करता येऊ शकतील. माचाळचे पठार नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सध्या मुंबई, पुण्यासारख्या महानगरी वातावरणात वाढलेल्या मुलांना खेडे कसे असते, हे दाखवण्याचा ‘व्हिजिट व्हिलेज’ हा पर्यटनप्रकार विकसित होत आहे. यासाठीही माचाळ उत्तम पर्याय ठरेल.

पिरसा

एकूणच अशा पद्धतीने माचाळचा विकास साधताना स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असावा. त्यासाठीच माचाळमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षांनंतर रस्ता पोहोचल्यानंतर प्लास्टिक आणि प्रदूषणात वाढ करणाऱ्या, गर्भश्रीमंत निसर्गाची अपरिमित हानी करणाऱ्या पर्यटन विकासाऐवजी स्थानिकांच्या उत्थानाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून हिलस्टेशन माचाळसोबतच निसर्गसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जोपासत ती जगापुढे आणणारे पर्यटन साकारावे लागेल. तरच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक आगळेवेगळे माचाळ गिरीस्थान जगाच्या पर्यटन नकाशावार येईल.

  • विजय हटकर,
    समन्वयक संचालक –
    माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था, लांजा
    (संपर्क : ८८०६६३५०१७)
coronavirus

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ नवे रुग्ण; ३८ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ३८ रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे ३१ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय म्हणजेच उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या अद्यापही ५००च्या खाली आलेली नाही.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात आज सात करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १८ ऑक्टोबर) करोनाचे नवे २२ रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. यापूर्वीच्या चार आणि आजच्या तीन अशा जिल्ह्यातल्या सात करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आज झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या आता २८९ आहे.

Continue reading

hands with latex gloves holding a globe

रत्नागिरी जिल्ह्यात ५१ नवे रुग्ण; ३२ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ ऑक्टोबर) करोनाचे नवे ५१ रुग्ण आढळले, तर ३२ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या आता ३०२ आहे.

Continue reading

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply