जागतिक पर्यटन दिन स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांचा सोमवारी सत्कार

स्पर्धेवर राजापूरच्या छायाचित्रकारांचे वर्चस्व

रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेत प्रदीप कोळेकर आणि जगदीश पवार या राजापूरच्या दोघा छायाचित्रकारांनी पहिले दोन क्रमांक पटावले. त्यांच्यासह विजेत्यांचा सत्कार सोमवारी, २७ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत पर्यटन परिषदेत होणार असून त्यांना पारितोषिकेही दिली जातील.

हर्डी (ता. राजापूर) येथील गांगो मंदिर परिसर (प्रदीप कोळेकर)

स्पर्धेत साहिल मुक्री यांनी तिसरा क्रमांक मिळवला. ओम पाडाळकर, निरामय साळवी आणि लतिकेश घाडी यांनी उत्तेजनार्थ यश मिळविले आहे. पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला आज स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधताना रत्नागिरी जिल्ह्यातील अस्सल कोकण परिचित होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील परिचित, अपरिचित आणि अप्रकाशित पर्यटन स्थळांचा शोध व्हावा आणि जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत ती स्थळे पोहोचावीत, असा स्पर्धेचा हेतू होता.

प्रदीप कोळेकर यांचे छायाचित्र

स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, वर्षा पर्यटन, निसर्गरम्य दृश्ये, नद्या, तलाव, प्राणिजीवन, गिर्यारोहण, ऐतिहासिक स्थळे, लेणी, गड, किल्ल्यांची छायाचित्रे आली होती. विजेत्या स्पर्धकांना केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रमाणपत्र, टी-शर्ट दिला जाणार आहे. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये, दोन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पहिल्या तीन क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी इन्फिगो आय केअर आणि सुधीर रिसबूड, अजय बाष्टे, सुहास ठाकूरदेसाई यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.

लतिकेश घाडी यांचे छायाचित्र

दरम्यान, जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने रत्नागिरीत उद्या (दि. २७ सप्टेंबर) पर्यटन परिषद होणार आहे. अपरिचित रत्नागिरी हा या परिषदेचा मध्यवर्ती विषय आहे. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रत्नागिरीत मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्हच्या कॉन्फरस हॉलमध्ये होणार असलेल्या या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांच्या उपस्थितीत होईल. इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, निसर्गयात्री संस्था आणि मैत्री ग्रुपच्या सहकार्याने ही परिषद उद्या सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे.

मांडवी (रत्नागिरी) जेटी (ओम पाडळकर)

यावेळी ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, रायगडच्या हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्रात पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक सारंग ओक, आनंदवन निवासचे संचालक डॉ. गिरीश बापट, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई साताऱ्याचे कृषी पर्यटन अभ्यासक प्रमोद शिंदे, रोबोटिक झू प्रॉडक्शन रोबोटिक डिजिटल गार्डनचे प्रवीण किणे मार्गदर्शन करणार आहेत. पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व व्यावसायिक आणि पर्यटनप्रेमींनी या परिषदेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि परिषदेचे निमंत्रक राजू भाटलेकर यांनी केले आहे.

(पहिल्या दोन्ही विजेत्या स्पर्धकांचे संपर्क क्रमांक असे – प्रदीप कोळेकर – 9422382061, जगदीश पवार – 9168543460)

दांडे अणसुरे, ता. राजापूर येथे मच्छीमार जाळे फेकताना जगदीश पवार यांनी टिपलेले छायाचित्र
खोरनिनको (ता. लांजा) नदी आणि डोंगरदरी (निरामय साळवी)
कशेळी (ता. राजापूर) येथील देवघळी (साहिल मुक्री)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply