माचाळ लोककला महोत्सवाची जोरदार तयारी सुरू

लांजा : तालुक्यातील माचाळ या थंड हवेच्या ठिकाणी उद्या (दि. ११ मार्च) सायंकाळी सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गावात सार्वजनिक स्वरूपात प्रथमच होणार असलेल्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने या महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. माचाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असले तरी या गावाकडे जाणाऱ्या सूचनाफलकांचा अभाव होता. तो लक्षात घेऊन संघातर्फे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग तसेच दाभोळे ते वाटूळ मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड आणि अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फलक लावण्यात आले आहेत.

दरम्यान, महोत्सवाची तयारीही सुरू आहे. कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचला. त्यामुळे आता त्या गावाच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. त्यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणार आहे. मात्र या विकासप्रकियेत १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकणातील गाव कसे होते, याची ओळख एकविसाव्या शतकात करून देणारी माचाळची ग्रामीण संस्कृती जपायला हवी. माचाळच्या आल्हाददायक, थंड हवेच्या गिरीस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे. हे लक्षात घेऊन माचाळमधील लोकसंस्कृती आणि तेथील दीर्घायुषी बनविणाऱ्या ग्रामीण शाश्वत जीवनशैलीची ओळख करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून माचाळ ग्रामस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी सायंकाळी ४ वाजता होणार असून या महोत्सवात माचाळमधील निरोगी वातावरणात शतायुषी जीवनाचा आनंद घेणाऱ्या सखाराम भातडे आणि सौ. भातडे या दाम्पत्याचा सन्मान केला जाणार आहे. सायंकाळी ५ नंतर लोककला महोत्सवांतर्गत सापड लोककला, डफावरचे नृत्य, फुगडी नृत्य, जाखडी नृत्य, माचाळ विशेष नृत्य, आदिवासी आणि शेतकरी नृत्य सादर होणार आहे. माचाळ पर्यटनाची दिशा या विषयावर पर्यटन अभ्यासक लेखक धीरज वाटेकर, पत्रकार-लेखक विजय हटकर यांचे व्याख्यान होणार आहे. श्री. हटकर यांचे माझे माचाळ – रत्नागिरी जिल्ह्यातील गिरीस्थान या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे.

महोत्सवाला सिंधुरत्न समृद्धी योजनेचे निमंत्रित सदस्य प्रमोद जठार, किरण सामंत, कोकणभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, सुभाष लाड, सुनील कुरूप, विवेक सावंत, शिपोशी सरपंच हरेश जाधव, राजू भाटलेकर, पालू-माचाळच्या सरपंच सौ. वनिता नामे, उपसरपंच सागर गाडे, माचाळचे गावकर पांडुरंग पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहून माचाळमधील लोककलांचा व पर्यटनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply