रत्नागिरी : पहिल्याच संधीत राज्याच्या अर्थसंकल्पातून अमृतधारांचा देवेंद्र फडणवीस यांनी वर्षाव केला असून रत्नागिरीसह कोकणालाही हा अर्थसंकल्प लाभदायी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
श्री. फडणवीस यांनी आज विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर श्री. पटवर्धन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, शिक्षणासाठी १ लाख २६६ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे. मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणाही अमृतवर्षावासारखी आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काही भरीव योजना या अर्थसंकल्पात दिसतात. एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. पीक विम्याच्या हप्त्याची पूर्ण रक्कम राज्य शासन भरणार आहे. शेतकऱ्यांना अधिकचे ६००० या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत. मागेल त्याला शेततळे प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान, पंचनामे ई-पंचनाम्याच्या माध्यमातून होणार असल्याचे अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले आहे. कोकणासाठी काजू फळ विकास योजना सुरू करण्यात येत आहे. रत्नागिरीतील काजू व्यवसायिकांना नवी संधी यातून उपलब्ध होईल. काजू प्रकल्पासाठी ३६ हजार कोटी अनुदान जाहीर झाले आहे. पारंपरिक मच्छीमारांसाठी ५ लाख विमा संरक्षण देण्याचे घोषित केले आहे. याचा लाभ रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमारांना होणार आहे.
श्री. पटवर्धन म्हणाले, रत्नागिरीमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी पार्क घोषित झाले आहे. रत्नागिरीचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार ही घोषणा महत्त्वपूर्ण आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन १० रुपये करण्याचा, तर कोतवालांचे मानधन १५ हजार रुपये करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात केलेली वाढ प्रशंसनीय आहे. महिलांना व्यवसाय करात दिलेली सवलत, बचत गटातील उत्पादकांसाठी मुंबईमध्ये युनिटी मॉल सुरू करण्याची घोषणा, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देतानाच लेक लाडकी योजना प्रभावी करत सज्ञान मुलीला सज्ञान होताच ७५ हजार रोख दिले जाणार असल्याची घोषणा खूप उपयुक्त ठरणारी आणि स्त्रीच्या भवितव्याची काळजी घेणारी योजना ठरेल.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचार खर्चाची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढवतानाच २०० नवी रुग्णालये या योजनेसाठी पात्र करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही वाढीव मर्यादा अमृतदायी ठरणार आहे. आरोग्य विभागासाठी ३ हजार ५०० कोटींची भरीव तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांबाबत फडणवीस जागृत आहेत, हेही या अर्थसंकल्पाने दाखवून दिले आहे. समृद्धी महामार्गाचे ८८ टक्के काम पूर्ण होत असताना या योजनेचा विस्तार अनेक उड्डाण पूल निर्मिती असे अनेक प्रकल्प या अंदाजपत्रकात दिसतात. हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात अमृतधारा बरसल्याप्रमाणे अनुभव देणारा, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गतिमानता देणारा आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणे महाराष्ट्राच्या विकासाची यशोगाथा साकार होण्यासाठी प्रशस्त पदपथ साकारणारा हा अर्थसंकल्प आहे. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, महिला, युवा, उद्योग, शेती अशा प्रत्येक घटकाचा मागोवा घेत प्रत्येक घटकावर अमृताभिषेक करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

