Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

देशातील पहिले महिला कृषिमहाविद्यालय मांडकी येथे होणार

Advertisements

रत्नागिरी : महिलांचा कृषि शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेऊन, राज्य शासन आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण परिषदेने मांडकी-पालवण (ता. चिपळूण, जि.रत्नागिरी) येथील डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेला जिजामाता महिला कृषि महाविद्यालय मंजूर केले आहे. राज्यातीलच नव्हे, तर हे देशातील महिला कृषि महाविद्यालय आहे.

या शिक्षण संस्थेत अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू असून या संस्थेमध्ये सुमारे २५० एकर परिसर आहे. आंबा, काजू, नारळ, पोफळी, भात आणि इतर लागवड, गांडुळ खत प्रकल्प, पोल्ट्री, डेअरी इत्यादी प्रकल्प सुरू आहेत. ही संस्था कृषि महाविद्यालयातून प्रॅक्टिकल पदवीधर तयार करण्याचे काम गेल्या २३ वर्षांपासून करत आहे.

कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या कल्पनेतून हे महिला कृषि महाविद्यालय मंजूर झाले आहे. भारतातील एकूण शेती करणाऱ्यांपैकी जबळजवळ ७० टक्के महिला शेती करतात. त्यामुळे भविष्यात कृषि शिक्षण घेतलेल्या महिला शेतीत उतरतील आणि आधुनिक शेती करतील. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास आहे.

जिजामाता महिला कृषि महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महिला कृषि महाविद्यालयाचा कोड नंबर ११३११ असा आहे. ज्या विद्यार्थिनींनी इतर महाविद्यालयाला प्राधान्यक्रम दिला असेल, त्यांना तो बदलून जिजामाता कृषि महाविद्यालयाला प्राधान्यक्रम देता येऊ शकेल. त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृह, मेस, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, वर्गखोल्या, सुसज्ज ग्रंथालय, उच्चशिक्षित आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग इत्यादी बाबी नियमाप्रमाणे उपलब्ध आहेत. सर्व सोयींनी युक्‍त असे हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय होईल, असा विश्‍वास डॉ.तानाजीराव चोरगे यांनी व्यक्‍त केला आहे.

महिला कृषि महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच धनंजय मुंढे, अब्दुल सत्तार, राजेंद्र देवरे या मंत्र्यांचेही सहकार्य लाभल्याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले. प्रवेशासाठी डॉ. निखिल चोरगे (९९६००६४४४६, ८९५६९२९८६९) किंवा डॉ. संकेत कदम (९४२११५४५९४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version