महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे

रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची निवड झाली आहे.

डॉ. चोरगे यांच्यासह ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विद्याधर अनास्कर आणि दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. प्रथमच परिषदेची ही सभा ऑनलाइन घेण्यात आली.

कथा, कादंबरी, नाटक, बँकिंग आदी विषयांवरील चाळीसहून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या डॉ. चोरगे यांचे झेप हे सुमारे आठशे पानांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ते वाचल्यावर एका सर्वसामान्य माणसाने स्वकर्तृत्वाने अनंत अडचणींवर मात करत घेतलेली सामर्थ्यशाली झेप अनुभवास येते. त्यांच्या लेखणीतून उतरलेले जीवनानुभव विविधांगी आहेत. उत्तम सामाजिक भान असलेल्या डॉ. चोरगे यांचे सहकार क्षेत्रातील काम आदर्शवत आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीत त्यांच्या भक्कम नेतृत्वाचे मोठे योगदान आहे.

शैक्षणिक क्षेत्रात आणि शेतीत रमणाऱ्या डॉ. चोरगे यांच्या साहित्यिक कार्याच्या गौरवार्थ गुहागर येथील ज्ञानरश्मी वाचनालयाने आपल्या सभागृहाला त्यांचे नाव दिले आहे. दोन वर्षांपूर्वी चिपळूण येथे झालेल्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरानेही आपले ‘सन्माननीय सदस्यत्व’ त्यांना प्रदान केले आहे.

बाळ माने यांच्याकडून अभिनंदन

सहकार, साहित्य, शिक्षण, कृषि, साहित्य, क्रीडा आदी विषयात नियमित सक्रिय वावर असलेले डॉ. चोरगे यांची निवड झाल्याने कोकणाला पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाचा मान मिळाला असून ही अभिनंदनास्पद बाब आहे, अशा शब्दांत रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी आनंद व्यक्त केला असून डॉ. चोरगे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच डॉ. चोरगे यांच्या उपाध्यक्षपदामुळे कोकणातील साहित्यिक चळवळीला बळ मिळेल, असा विश्वास श्री. माने यांनी व्यक्त केला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply