रत्नागिरी : घरोघरी तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली राजिवडा आणि मिरकरवाडा येथे मुस्लिम बांधवांना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.
हे ध्वज सन्मानपूर्वक आपल्या घरावर लावू, असे लहान मुले, महिला आणि पुरुषांनी सांगितले.
भाजपातर्फे सुमारे चारशे ध्वज राजिवडा येथे मौलाना अबुल कलाम आझाद नगरपालिका उर्दू शाळा क्र. १८ आणि मिरकरवाडा परिसरामध्ये वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला सौ. माधवी माने, मिहिर माने, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष मन्सूर मुकादम, अमित विलणकर, रफिक शेख, जावेद म्हसकर, ताहिल कातलीकर, जैद सुवर्णदुर्गकर, जमीर सुवर्णदुर्गकर, अझर पाटील, फैय्याज हुनेरकर, अजमल हुनेरकर, सागर विलणकर आदी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त हे ध्वज दिले आहेत. याचा योग्य तो सन्मान ठेवावा आणि आपल्या घरावर ध्वज नियमानुसार लावावा, असे आवाहन श्री. माने यांनी यावेळी केले. देशाच्या शतक महोत्सवावेळी २०४७ मध्ये आजची लहान मुले भावी पिढी कार्यरत असणार आहे. त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची जाणीव जागृत करू या, नगरपालिकेच्या शाळांमध्येसुद्धा चांगल्या दर्जेदार सुविधा निर्माण करू या, असे त्यांनी सांगितले.
ध्वज वितरणाचे औचित्य साधून दि यश फाऊंडेशनच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, रंगपेटी, पट्टी आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका समीना काद्री यांनी स्वागत केले. समारंभाला उपशिक्षिका श्रीमती मसउदा मुल्ला, स्वयंसेविका रफत तांडेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नगिना काद्री, रेशमा जांभारकर, इफ्फत मिरकर आदी उपस्थित होत्या.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







