युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपातर्फे नमो चषक क्रीडा महोत्सव

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीतर्फे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देण्याकरिता महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय “नमो चषक” क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. माने म्हणाले की, केंद्रामध्ये २०१४ मध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर सर्व क्षेत्रात आमूलाग्र चांगले, सकारात्मक बदल घडले. खेलो इंडियाच्या रूपाने देशातील खेळाडूंना प्रोत्साहन, बळ मिळाले. त्याच धर्तीवर आता भाजपाकडून नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या स्पर्धांकरिता नावनोंदणीची अंतिम तारीख १० जानेवारी आहे. प्रत्येक विधानसभा स्तरावर या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ५ हजार क्रीडापटू, कलाकारांची नोंदणी व्हावी. क्रिकेटच्या स्पर्धेसाठी गावाचा एक संघ ग्राह्य धरण्यात येणार आहे. नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धांकरिता प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ७ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. येत्या युवक दिनी म्हणजे १२ जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सर्व स्पर्धा झाल्यानंतर २६ जानेवारीला बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

अन्य स्पर्धांमध्ये कुस्ती, फुटबॉल, खो-खो, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, धावणे १०० मीटर, ४०० मीटर (अॅथलेटिक्स) या क्रीडा स्पर्धा आहेत. तसेच सांस्कृतिक विषयांत चित्रकला, रांगोळी, गीतगायन, नृत्य स्पर्धा, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा खुल्या गटात स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक विधानसभानिहाय मॅरथॉन (५ कि.मी.), वॉकेथॉन (३ कि.मी.), सायकलिंग स्पर्धा (१० कि.मी.) बॅडमिंटन, संगीत खुर्ची या स्पर्धा होतील.

नमो चषक स्पर्धेची नावनोंदणी १० जानेवारीपर्यंत करता येईल. स्पर्धेचे ठिकाण व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा स्तरावर स्पर्धा यशस्वी होण्याची जबाबदारी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळ माने, युवा मोर्चा, क्रीडा आघाडीवर आहे.

भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, शहराध्यक्ष राजन फाळके, मंदार खंडकर, सुशांत पाटकर आदी उपस्थित होते.

नमो चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-

https://namochashak.in/

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply