आरोग्य क्षेत्रात सेव्ह रत्नागिरीसाठी फोरम तयार करणार – बाळ माने

रत्नागिरी : नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, याकरिता फोरम तयार करण्यात येणार आहे. यातून आरोग्य सेवेचा रत्नागिरी पॅटर्न विकसित करू या, असे प्रतिपादन भाजपा नेते, माजी आमदार बाळ माने यांनी केले.

भाजपातर्फे रत्नागिरीच्या आरोग्य सुविधांवर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात आयोजित आरोग्यविषयक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यामुळे विविध जिल्ह्यांत महाविद्यालये होत आहेत. हे धोरण खूप चांगले आहे. रत्नागिरीमध्येही आवश्यक वैद्यकीय सेवा चांगली मिळाली पाहिजे. सेव्ह रत्नागिरी, विकसित रत्नागिरीसाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी एकत्र येऊन फोरम स्थापन करण्यात येईल. आपण समस्या निवारण केंद्र सुरू करत नसून हा फोरम आहे. आरोग्य व्यवस्था १०० टक्के सुधारलीच पाहिजे. यापुढे शिक्षण, शेती, विकास अशा विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.

डॉ. कल्पना मेहता म्हणाल्या की, या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी निधी मिळणे आवश्यक आहे. अपुरा वीजपुरवठा होतो. इंटरनेट, वाय-फायची पुरेशी सुविधा नाही. कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची संख्याच पुरेशी भरत नाही. विविध सरकारी योजनांची माहिती देणारी यंत्रणा नाही, याकरिता समुपदेशक, सल्लागारांची आवश्यकता आहे.

डॉ. अरुण डिंगणकर यांनी ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्या मांडल्या. तसेच रक्तदानासंबंधी उपयुक्त माहिती दिली. डॉ. नीलेश नाफडे म्हणाले की, २५ वर्षे नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटरची पुन्हा नोंदणी करावी लागते. सरकारकडे पैसे भरावे लागतात. शासनाकडून वेळेवर नोंदणी करून मिळत नाही. आम्हाला त्रास देणार असाल तर सेवेसाठी जिल्हा रुग्णालयात बोलवूसुद्धा नका. पण आम्ही मदतीकरिता जातो. आज रत्नागिरीमध्ये नेफ्रॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जरी सर्जन, स्पाइन सर्जन, हिप्नो सायकॉलॉजिस्ट, पेडिअॅट्रिक सर्जन नाही. येथे नवीन डॉक्टर्स आले पाहिजेत. जुन्या अनेक समस्या सोडवल्या जात नसल्याने नवीन डॉक्टर्स येत नाहीत.

आयएमएचे अध्यक्ष डॉ. अतुल ढगे म्हणाले की, आरोग्य व्यवस्थेकरिता निधी अपुरा पडतो. त्यामुळे अनेक उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ घेता येत नाहीत. भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ भाग आहे. रुग्ण अत्यवस्थ असल्यास त्याला उपचारांकरिता आणणे शक्य होत नाही. सरकारी आणि खासगी रुग्णालयात पुरेसे कर्मचारी, नर्सेस, वॉर्डबॉय नाहीत.

पायाभूत सुविधेचा प्रचंड खर्च सोसावा लागतो. वीजपुरवठा सुरळित नसल्याने जनरेटर, यूपीएस असा भांडवली खर्च वाढतो. वेगवान इंटरनेट नाही. वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याचा खर्च भरपूर आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ, परिचारिका, आया, कर्मचारी मिळत नाहीत. परवानग्या, परवाने नूतनीकरण करण्यात सरकारी पातळीवर खूप अडचणी सहन कराव्या लागतात, अशा समस्या डॉक्टरांनी मांडल्या.

यावेळी रत्नागिरीतील जागरूक नागरिकांनी वैद्यकीय सेवा, सुविधा सुधारण्यासाठी काही सूचना केल्या. काही अनुभव मांडले. या साऱ्याची नोंद करून ठेवण्यात आली आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी स्वागत करून अशी चर्चासत्रे विकसित रत्नागिरीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. सर्व मान्यवर डॉक्टरांचा सत्कार बाळ माने यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सतीश शेवडे यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply