स्वयंपूर्ण कोकण हे मिशन घेऊन काम करायला हवे : डॉ. प्रमोद सावंत

चिपळूण : कोकणाने भारताला अनेक प्रतिभावंत माणसे दिली आहेत. ते लक्षात घेता आता स्वयंपूर्ण कोकण हे मिशन राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्र यांनी आयोजित केलेला अपरान्त भूषण पुरस्कार वितरण सोहळा ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात झाला. अपरांत भूषण पुरस्कार डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, संस्कृती जपताना पर्यटन विकास, उद्योग वाढवून कोकणाला आणि देशाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी डॉ. श्रीधर ठाकूर यांच्यासारख्या लोकांनी पुढाकार घ्यावा. चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे काम प्रेरणादायी आहे. या वाचनालयाचे कलादालन पाहिल्यानंतर आपल्याला माहीत नसलेल्या कोकणातील प्रतिभावंत माणसांची ओळख झाली. या कलादालनात लोकमान्य टिळकांपासून ते नारायण राणे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे वाचनालयाच्या कलादालनात डॉ. श्रीधर ठाकूर यांचे तैलचित्र लावावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी डॉ. श्रीधर ठाकूर म्हणाले, आई-वडील, पत्नी, कुटुंबीय, मित्र परिवार, सहकारी डॉक्टर, इन्फिगोचे सर्व कर्मचारी हे माझ्या आयुष्यात दहीहंडीच्या खालील सर्व थरांप्रमाणे आहेत. त्यांच्यामुळे मी या यशाच्या शेवटच्या थरावर पोहोचलो आहे.

कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी वाचनालयाची माहिती दिली. डॉ. ठाकूर यांचा परिचय संचालिका मनीषा दामले यांनी करून दिला. मानपत्र वाचन अंजली बर्वे यांनी केले, तर सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले.

कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, भाजपचे बाबा परुळेकर, डॉ. श्रृती ठाकूर, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार डॉ. विनय नातू, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, साहित्यिक प्रकाश देशपांडे, उद्योजक डॉ. प्रशांत पटवर्धन, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, माजी सभापती रामदास राणे, माजी नगरसेवक आशीष खातू, विजय चितळे, रसिका देवळेकर, सुनील कुलकर्णी, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, राष्ट्रपाल सावंत, अरुण इंगवले, राजेश जोष्टे, अभय चितळे, सुनील जांभेकर, नित्यानंद भागवत, महेश दीक्षित, इमरान कोंडकरी, अमोल भोबस्कर, विनायक ओक, अविनाश पोंक्षे, मधुसूदन केतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply