मालवण : आचरे (ता. मालवण) येथे रविवार, दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी बाल कथाकथन महोत्सव साजरा होणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रची आचरे शाखा आणि मालवणच्या साने गुरुजी कथामालेने महोत्सवाचे आयोजन केले आहे. आचरे येथील बिड्ये विद्यामंदिर आचरे क्र. १ या शाळेत पूज्य प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरीमध्ये हा कथाकथन महोत्सव होईल. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र बँकेचे रत्नागिरीचे झोनल मॅनेजर सागर घनश्याम नाईक यांच्या हस्ते आणि आचरे शाखाधिकारी सिलंबू अरुमुगम यांच्या उपस्थितीत होणार आहे. मालवण कथामालाअंतर्गत शाळेतील तिसरी ते आठवीपर्यंतची मुले यात सहभागी होणार असून वर्गवार, शाळास्तरातून यशस्वी झालेले यशवंत स्पर्धक यात सहभागी होणार आहेत.
तिसरी व चौथीसाठी ‘श्यामची आई’ या पुस्तकातील कथा, पाचव- सहावीसाठी ‘एक समाज सुधारक’ या विषयावर कथा तर सातवी- आठवीच्या गटासाठी ‘संस्कार कथा’ असे स्पर्धेचे विषय आहेत. विजेत्यांना अनुक्रमे ५०० रुपये, ३०० आणि २०० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. यासोबतच इतरही पुरस्कार व आकर्षक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
कथानिवेदक स्पर्धक विद्यार्थ्यांची नावे बुधवार, दि. २ ऑक्टोबरपूर्वी स्पर्धा संयोजक समितीकडे देण्यात यावीत, असे आवाहन सुगंधा केदार गुरव (दूरभाष ९४२००७८५१९) यांनी केले आहे. पारितोषिकांचे वितरण २० ऑक्टोबर रोजी कथामालेचे सल्लागार समिती सदस्य प्रकाश पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आणखी एक सदस्य सदानंद कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

