Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सुलभा फणसळकर यांचे नाचणीचे स्प्रिंग रोल सर्वोत्कृष्ट

Advertisements

रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल आयोजित पाककला स्पर्धेमध्ये सुलभा फणसळकर यांची नाचणीचे स्प्रिंग रोल ही पाककृती सर्वोत्कृष्ट ठरली.

झरेवाडी गावरान मसाला आणि कळंबटे फूड फार्म पुरस्कृत, रत्नागिरी तालुकास्तरीय नाचणी पाककला स्पर्धेत रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातून ४२ स्पर्धकांनी भाग घेतला. हातखंबा ग्रामपंचायत सभागृहात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत दीक्षा कळंबटे (नाचणी पौष्टिक मोदक), वैशाली देवदास (नाचणी मिसळ पाव), श्रुती बने (नाचणी चाट) साक्षी पाटील (नाचणी पौष्टिक रबडी) यांनी गुणानुक्रमे यश मिळविले. नाचणीपासून बनविलेल्या मोमोज, गुलाबजामुन, चटपटी चाट, कटलेट, बर्फी, पातोळे, केक खाकरा, पास्ता, अनारसे, ढोकळा, शिरवाळे, थालीपीठ असे अनेक पदार्थ लक्षवेधी ठरले. खवय्यांनी या सर्व पदार्थांची चव चाखण्याचा मनमुराद आनंद घेतला.

स्पर्धेचे परीक्षण शेफ मेघना शेलार आणि ताराचंद ढोबाळे यांनी केले. सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून लायन्स क्लब रत्नागिरी झोन चेअरमन श्रेया केळकर प्राध्यापक चंद्रमोहन देसाई, श्रीपाद केळकर उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनीलदत्त देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मनोज कुमार खानविलकर आणि संपूर्ण टीमने मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी सावेकर, सचिन सावेकर आणि मनस्वी जाधव यांनी केले, तर आभार अवधूत कळंबटे यांनी मानले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version