Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सर्वसामान्यांना आरोग्यसुविधा देण्यावर शासनाचा भर : मुख्यमंत्री

Advertisements

रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी शासन पावले उचलत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन नमो ११ सूत्री कार्यक्रमाचा शुभारंभही यावेळी झाला.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत केली जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांनी युक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. दिलेला शब्द पूर्ण करणे, वचनपूर्ती करणे आणि वेळेत पूर्ण करणे याचे ज्वलंत उदाहरण रत्नागिरीचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला होता आणि वर्षभरातच त्याचा प्रारंभ होत आहे. येथे ४३० खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी ४०० ठिकाणी झाली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे, सर्वसामान्यांच्या मनातले गतिमान सरकार आहे, हे याचे उदाहरण आहे. आम्ही जनतेशी बांधील आहोत. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे.

आरोग्य विभागावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे. ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेची रक्कम दीड लाखापासून ५ लाखापर्यंत वाढविली आहे. योजना वाटणारे, योजना देणारे हे सरकार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून एक कोटी ८० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोकणात जेवढी विकासकामे आणता येतील तेवढी आणू. रत्नागिरी विमानतळाला ११८ कोटी मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीमधून १६० कोटी रुपये खर्च झाले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु, मायबाप बळीराजाने चिंता करू नये. बळीराजाला वाऱ्यावर सोडणारे नाही. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबद्ध आहे. नमो ११ सूत्री कार्यक्रम या सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अनेक वर्षांची मागणी या महाविद्यालयामुळे पूर्ण झाली आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले. भविष्यात टप्प्याटप्प्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. बीएससी नर्सिंग महाविद्यालयदेखील या महाविद्यालयात सुरू केले जाईल. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी भरतीसाठीचा शासन निर्णय काढूनच मी आज येथे आलो आहे. शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, नवीन सरकार स्थापन झाले. गोव्यात असताना मुख्यमंत्री महोदयांनी कुठचे काम करायचे आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी अनेक वर्षांपासून मागणी असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी मी बोललो. सकाळी ७ वाजता मुख्यमंत्री महोदयांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना फोन लावून मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्यास सांगितले. त्यासाठी ५२२ कोटी रुपये मंजूरही केले. पुणे, मुंबईनंतर रत्नागिरीला परिपूर्ण एज्युकेशन हब बनविण्यासाठी मेडिकल कॉलेजदेखील सुरू केले आहे. उद्योजकांना १०० टक्के इन्सेन्टिव्ह देण्याचा निर्णयदेखील घेतला. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले मुख्यमंत्री असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आभार मानले.

वसंत घाणेकर, संजय पावसकर यांना घरकुल योजनेसाठी ६ लाख ८० हजार निधी वितरित करण्यात आला. दिनेश शितप व मुक्ता शिरसाठ, सूरज अवसरे व सोनाली जाधव यांना दिव्यांग-दिव्यांग विवाह योजनेतून ६ लाख निधी वितरित करण्यात आला. अंकिता कोलगे, संदीप कांबळे, भारती भायजे, संतोष रहाटे यांना स्वयंचलित ३ चाकी सायकली वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील १४ विद्यार्थ्यांना व्हिल चेअर, सीपी चेअरचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यातील २ हजार ४४३ सीआरपींना मोबाइल वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात ६ महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाइल वाटप करण्यात आले. नमो शेततळी अभियानांतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये मंदार सरपोतदार यांचा समावेश होता.

उद्घाटन समारंभानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी उभ्या उभ्याच साधलेला संवाद

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version