रत्नागिरी : रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते श्यामराव पेजे यांचे नाव आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. इमारतीचे उद्घाटनही श्री. शिंदे यांनी केले.
लोकनेते श्यामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे युवकांना प्रेरणा देणारे चालते बोलते स्मारक ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, या इमारतीच्या भूमिपूजनाला मी आलो होतो, एक-सव्वा वर्षात इमारत उभी राहिली आणि इमारतीचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे, ही समाधानाची बाब आहे. जनतेसाठी झटणाऱ्या श्यामराव पेजे यांचे नाव इमारतीला दिले ही बाब अभिमानाची आहे. इथल्या सर्वांसाठीच ते प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हे महाविद्यालय मदत करणार आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. २०४७पर्यंत भारत विकसित करण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. त्यासाठी कौशल्ये आणि ज्ञान संपादित करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला सहा ते १० हजार रुपयांचा प्रशिक्षण भत्ता मिळणार आहे. त्यातून त्यांना कौशल्ये प्राप्त होतील. प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल आणि येणाऱ्या उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार आहे. आपले राज्य उद्योगपूरक झाले आहे. उद्योग आले, तर नोकऱ्या मिळतील. हे सरकार नोकऱ्या देणारे हातही तयार करत आहे.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी हे शैक्षणिक हब व्हावे हे दोन वर्षांपूर्वी मी पाहिलेले स्वप्न आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे साकार होत आहे. मुख्यमंत्र्यांनी ५०० कोटी रुपये वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणि २५० कोटी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी तात्काळ मंजूर केले. पुढच्या वर्षापासून शासकीय विधी महाविद्यालयदेखील सुरू होणार आहे. मुख्यमंत्री छात्र प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३१९ मुलांना रोजगार प्राप्त झाला याचा विशेष आनंद आहे.
यावेळी कुणबी समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इमारत उभारणाऱ्या निर्माण ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

