शिरोडा येथे बुधवारी प्रेरणा साहित्य संमेलन

वेंगुर्ले : आजगाव (ता. सावंतवाडी) येथील साहित्य प्रेरणा कट्टा संस्थेतर्फे शिरोडा (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथे येत्या बुधवारी (दि. २५ डिसेंबर) प्रेरणा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

आजगाव येथे ऑक्टोबर २०१८ रोजी स्थापन झालेल्या साहित्य प्रेरणा कट्टा या संस्थेतर्फे स्थापनेपासून दर महिन्याला साहित्यिक कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामध्ये पुस्तके, साहित्यिक आणि साहित्यविषयक चर्चा केली जाते. कोकणचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सध्या त्यांच्या साहित्याविषयीची चर्चा दर महिन्याच्या कार्यक्रमात केली जात आहे. या कट्ट्याच्या पन्नासाव्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने येत्या बुधवारी, दि. २५ डिसेंबर रोजी दिवसभराचे प्रेरणा साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे. रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगानेच हे संमेलन ग्रंथालयाच्या सभागृहात होणार आहे.

संमेलनाचे अध्यक्षस्थान गोव्यातील लोकसाहित्याच्या अभ्यासक तथा लेखिका प्रा. सौ. पौर्णिमा राजेंद्र केरकर भूषवितील. परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन असे विविध कार्यक्रम संमेलनात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होईल. सकाळी ११ वाजता वाचनवृद्धीसाठी मी केलेले प्रयोग या विषयावरील परिसंवाद होईल. प्रा. विजय फातर्फेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात प्रा. गजानन मांद्रेकर आणि सुरेश ठाकूर सहभागी होणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता ‘मुबाई’ या कवी विनय सौदागर यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन होईल. घुंगुरकाठी या आडाळी (दोडामार्ग) येथील संस्थेचे अध्यक्ष आणि राज्य शासनाचे निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांच्या हस्ते प्रकाशन होईल. शिरोड्याच्या सरपंच सौ. लतिका रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. दुपारी १ वाजता कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या “रंगवाचा” विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येईल.

भोजनाच्या विश्रांतीनंतर दुपारी सव्वादोन वाजता कवी डॉ. सुधाकर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. दुपारी साडेतीन वाजता स्मरण जयवंत दळवींचे… हा कार्यक्रम होईल. त्यामध्ये आमचे जयाकाका या विषयावर सौ. शुभा कुलकर्णी बोलतील, तर वाट ही सरेना या कथेचे वाचन सौ. सोनाली परब सावळ-देसाई करतील. खुल्या साहित्य चर्चेविषयीचा आढावा र. ग. खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे घेतील. लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाल्यानंतर संमेलनाचा समारोप होईल.

साहित्यप्रेमींनी या साहित्य संमेलनास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे. अल्पाहार, चहापान तथा भोजन व्यवस्था करण्याच्या दृष्टीने संमेलनाचा उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी ९४०३०८८८०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply