लांजा : मराठी साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या उपाध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांच्या बेळगावी कवितेला साताऱ्यातील बापूसाहेब उनउने बोलीभाषा काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने राष्ट्रीय मराठी, कोकणी भाषेतील बोलीभाषेतील काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निष्ठावंत अनुयायी, रयत शिक्षण संस्थेचे सेवक, मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि छत्रपती शिवाजी कॉलेजचे माजी प्राचार्य शंकरराव ऊर्फ बापूसाहेब उनउने यांच्या नावे ही स्पर्धा सुरू करण्यात आली. मराठी बोली व भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोली भाषा कविता लेखन स्पर्धेचे आयोजन असलेली ही देशातील पहिली स्पर्धा छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. स्पर्धेत १२३ कवींच्या १८६ कविता सहभागी करून घेण्यात आल्या. स्पर्धेचा निकाल मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी जाहीर केला.
स्पर्धेत गडचिरोली येथील उपेंद्र रोहनकर यांच्या झाडी बोलीतील ‘डोरे राऊन आंद्रा’ या कवितेने प्रथम क्रमांक (५००० रुपये), दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक लांजा येथील कवयित्री डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या बेळगावी बोलीतील ‘सासूरवाशीन’ (४००० रुपये) आणि अनिता नंदू बर्गे यांनी लिहिलेल्या ‘जीनेचे एक पुस्तक’ या कोकणी बोलीतील कवितेने तीन हजार रुपयांचा तिसरा क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत ५०० रुपयांची १० विशेष पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. ते कवी असे किशोर वालावलकर, सावंतवाडी (इस्माईल ठाकूर कुरले गरयता – मालवणी), बी. एन. चौधरी, धरणगाव, जळगावा (अहिराणी म्हणी गोड), प्रशांत भंडारे, आमडी, चंद्रपूर (रोवणा – झाडी बोली), सुनील बावणे, चंद्रपूर (यांच्या लाव बेकनी – झाडी बोली), प्रा.भाऊसाहेब गोसावी (निमो – मालवणी), जयेश पायकर, गोवा (पोल्ली आणि चूल – कोकणी), नीलेश महिगावकर, सातारा (पतंग्या – सातारी), वैशाली पंडित, मालवण (वाडा वो माय – घाटी बोली), अविनाश बापट, हिंदळे, देवगड, सिंधुदुर्ग (नामो कुळकार – मालवणी), विलास चौगुले (गोजरी भावज – लोकगीत).
काव्य स्पर्धेचे परीक्षण शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख व बोलीभाषेचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे व कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमधील मराठी विभागातील प्राध्यापक प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के यांनी केले. स्पर्धेत सहभागी एकापेक्षा जास्त निवडलेल्या कवितांचा मिळून बोलीगंध हा प्रातिनिधिक कवितासंग्रह संपादक प्रा .डॉ. सुभाष वाघमारे आणि सौ. मीनल अशोक उनउने संपादित करणार आहेत. जानेवारीमध्ये पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

