Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीचा राज्यातील पहिला मॉल रत्नागिरीत उभारण्यासाठी प्रयत्न : उदय सामंत

Advertisements

दापोली : ‘बचत गटांची उत्पादनं चांगल्या प्रतीची असली पाहिजेत. प्रशिक्षण ही महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे पॅकेजिंग आणि विपणनासारख्या बाबींचं प्रशिक्षण मिटकॉनसारख्या संस्थेच्या माध्यमातून बचत गटांना दिलं जाईल. बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीचा राज्यातला पहिला मॉल येत्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्याच्या दृष्टीने पालकमंत्री म्हणून पावलं उचलली जातील,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आज (२२ मार्च) दापोलीत केलं. उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सरस प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्या वेळी ते बोलत होते.

एका जिल्ह्यात दोन सरस प्रदर्शनं भरवण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर प्रथमच गणपतीपुळ्यानंतर दापोलीला हे प्रदर्शन भरवण्याचा मान मिळाला. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, बचत गटांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. या वेळी गृह-राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version