गणपतीपुळ्यात महिला बचत गटांना उत्पादनविक्रीसाठी सहा महिन्यांत कायमस्वरूपी स्टॉल; उदय सामंत यांचे आश्वासन

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातल्या गणपतीपुळे येथे आज (२५ डिसेंबर) विभाग आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्यामार्फत महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात ७५ स्टॉल्स आहेत.

‘गणपतीपुळ्यात सरस प्रदर्शन केवळ पाच दिवस चालते. हे प्रदर्शन ज्या इमारतीत भरवले जाते, तिथे सीआरझेडमुळे कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करून देता येत नाहीत; मात्र यावर तोडगा काढून येत्या सहा महिन्यांत महिलांना कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करून दिले जातील,’ असे आश्वासन सामंत यांनी या वेळी दिले. गणपतीपुळ्यात वर्षभरात सुमारे १६ लाख भाविक येत असल्याने महिला बचत गटांच्या उत्पादनांची वर्षभर विक्री होऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत होणार आहे. गाळे बांधण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही सामंत या वेळी म्हणाले.

‘जिल्ह्यातील २६७० महिलांना मोफत मोबाइल देण्यात येणार असून, या मोबाइलच्या माध्यमातून महिला सरकारशी बोलू शकतील. १५० कोटीचे कर्ज महिलांना मंजूर करून देण्यात आले आहे. त्यांचा धनादेशही आज देत आहे. येत्या १५ दिवसांत महिला सक्षमीकरण योजना आणत आहोत,’ असेही पालकमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पिरजादे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सरपंच कल्पना पकये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती घाणेकर यांनी, तर आभारप्रदर्शन अयाज पिरजादे यांनी केले.

या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी पर्यटक आणि भाविकांना केले आहे. तसेच, ग्रामीण भागातील महिलांनी आपली उत्पादने शहरात आणून स्टॉलवर विक्री केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply