रत्नागिरी : भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपणे व उमद्या शास्त्रीय गायकांसाठी व्यासपीठ निर्माण करणे या उद्देशाने आर्ट सर्कल फाउंडेशन आणि सेंटर फॉर रिसर्च अँड प्रमोशन ऑफ इंडियन म्युझिक (CRPIM) यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत येत्या १६ ऑगस्ट रोजी विशेष स्वरभास्कर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाची स्वरभास्कर बैठक सेंटर फॉर रिसर्च अँड प्रमोशन ऑफ इंडियन म्युझिक यांच्या विशेष सहभागाने होणार आहे. वीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपणे आणि त्याचा प्रसार आणि प्रचार करणे हा आहे. बैठक नेटवर्क या उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था शास्त्रीय संगीत समीप बैठक परंपरा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. या पद्धतीमध्ये कलाकार आणि रसिकांचा संवाद घडून येतो, शास्त्रीय संगीताचा अधिक सजगपणे आस्वाद घेता येतो म्हणून ही परंपरा जपणे आणि ती वृद्धिंगत करणे याला CRPIM ने खूप महत्त्व दिले आहे. समान उद्दिष्टाने सुरू झालेल्या स्वरभास्कर बैठकीसाठी यंदा CRPIM चे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
उल्लेखनीय म्हणजे या सातत्यपूर्ण सांगीतिक उपक्रमाचे हे सोळावे वर्ष आहे. हा सुरेल सांगीतिक कार्यक्रम रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंखील ४:३० वाजता झाडगाव येथील माधवराव मुळ्ये सभागृहात रंगणार आहे.
विशारद गुरव, चैतन्य परब व सुप्रसिद्ध गायिका नूपुर गाडगीळ हे तरुण, होतकरू शास्त्रीय गायक ही बैठक रंगवणार आहेत. गुरू महेश देशपांडे आणि प्रसाद गुळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे शिक्षण घेत विशारद याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली आहे.
संगीत नाटकातून उत्तम गायक अभिनेता म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. तो उत्कृष्ट ऑर्गनवादकदेखील आहे. गायनाप्रमाणेच ऑर्गनवादनासाठीही आजवर त्याने पारितोषिके प्राप्त केली आहेत.
रत्नागिरीचा सुपुत्र चैतन्य परब याने आपली आई आणि प्रथम गुरू सौ. विनया परब यांच्याकडे गाण्याची प्राथमिक तालीम घेतली आणि त्यानंतर सध्या गेली ११ वर्षे तो सुप्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेवूंडी यांच्याकडे किराणा घराण्याचे धडे गिरवत आहे. आज रत्नागिरीचे हे दोन्ही सुपुत्र महराष्ट्रभरातील मानाच्या महोत्सवांमध्ये सादरीकरण करत आहेत.
गायिका नूपुर गाडगीळ संगीत विषयात विशारद तसेच एमए असून तिने ज्येष्ठ गायक पं. मधुकर गजाननराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्यांची तालीम घेत शास्त्रीय संगीताची बैठक पक्की केली. त्यानंतर श्रीमती शुभदा दादरकर, श्रीकांत दादरकर, रामदास कामत, अरविंद पिळगावकर, रजनी जोशी यांच्याकडूनही नाट्यसंगीताचे धडे गिरवले आहेत. हे तिन्ही कलाकार आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत.
अशा गुणी तरुण कलाकारांकडून करण्यात येणारे शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील विविध रचनांचे सादरीकरण या बैठकीचे मुख्य वैशिष्ट्य ठरेल.
या बैठकीस उत्कृष्ट लय व स्वरांची जोड देण्यासाठी तबलासाथ रत्नागिरीचे अथर्व आठल्ये आणि संवादिनीसाथ चैतन्य पटवर्धन करणार आहेत. या सर्वांच्या समन्वयातून रसिकांना एका अत्यंत समृद्ध आणि सुरेल सांगीतिक अनुभवाची अनुभूती लाभणार आहे.
रत्नागिरीतील सर्व संगीतप्रेमी, रसिक व नागरिकांनी १६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या बहारदार ‘स्वरभास्कर’ बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media

