रत्नागिरी : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा रत्नागिरी शहरातल्या पोलीस संचलन मैदानावर पार पडला. त्यामध्ये पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या वेळी केलेल्या भाषणात सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आलेख जनतेसमोर मांडला. रत्नागिरीला जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने, सहभागाने आपल्यासह प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी या वेळी दिली.
या वेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून यंदा एक लाख १७ हजार ९०७ लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध प्रकारचे लाभ देण्यात आले. एक हजार ३२३ महिलांना शेतकरी महिला म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. जिल्हा नियोजन समितीचा गेल्या वर्षीचा ४०६ कोटींचा निधी १०० टक्के खर्च झाला असून, या वर्षी त्यात वाढ करून तो ४३९ कोटी करण्यात आला आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. ३० कोटी रुपये खर्चून उभारलं जात असलेलं क्रीडा संकुल तीन महिन्यांत सुरू होणार असून, येत्या दोन-तीन महिन्यांत रत्नागिरीतून मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे, असंही सामंत यांनी सांगितलं.
भाट्ये येथे ‘सी-प्लेन’ सेवा, हाउसबोट टर्मिनल, पंचतारांकित हॉटेल, तरुणांना रोजगारासाठी ‘ग्रीन स्टील प्रकल्प’, ‘शिप बिल्डिंग’, ‘सीएनजी गॅस’ आणि ‘डिफेन्स क्लस्टर’ची उभारणी केली जाणार आहे. महिलांसाठी काजू बोंडापासून ज्यूस बनवण्याचा पहिला उद्योग सुरू करण्यात येईल. २५ कोटी रुपये खर्चाचे अद्ययावत मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. देशातील ‘मातृभाषेचे पहिले संग्रहालय’ रत्नागिरीत साकारले जाणार आहे, असंही सामंत यांनी सांगितलं.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण संख्या आज ४०० वरून ९०० पर्यंत पोहोचली आहे. उद्यमनगरमध्ये ३० खाटांचं अत्याधुनिक आयुष रुग्णालय उभारण्यात येत आहे. रत्नागिरीमध्ये बीएसी नर्सिंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५० कोटी रुपयांमधून पोलीस अधीक्षकांचं अद्ययावत कार्यालय, तसंच पोलिसांसाठी घरं उभारण्यात येत आहेत. सहा महिन्यांत त्याचं उद्घाटन होईल, असं पालकमंत्री म्हणाले.
तरुणांना व्यसनापासून व अंमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी पोलीस दलाने कडक कारवाई करत ५० आरोपींना अटक केली असून, १२ जणांना हद्दपार करण्यात आलं आहे. आणखी १२ जण हद्दपारीच्या वाटेवर आहेत. अंमली पदार्थांपासून जिल्हा मुक्त करण्यासाठी पोलीस दलाने पावलं उचलली असून, या मोहिमेत सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं.
शेतकरी बांधवांसाठी पावसाच्या अचूक नोंदीसाठी आता प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसवले जाईल. आंबा-काजू बागायतदारांच्या नुकसानीपोटी ५६ हजार ६२८ शेतकऱ्यांना ९८ कोटी ४४ लाखांची भरपाई थेट खात्यात देण्यात आली आहे. एमआयडीसीत ३० कोटी रुपये खर्चून बांधलं जाणारं क्रीडा संकुल ३ महिन्यांत सुरू होईल. प्रधानमंत्री आवास योजनेत ६ हजार १३६ घरकुलं, तर मोदी आवास योजनेत ५ हजार ४१८ घरकुलं पूर्ण झाली आहेत.
“रत्नागिरीचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन जीव ओतून काम करत आहे,” असं सांगून पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी परेडचं निरीक्षण केलं. यानंतर परेड कमांडर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली संचलनास प्रारंभ झाला. पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक १, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक २, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक ३, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सिद्धी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस महिला पथक, हवालदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बँड पथक, पलटण नाईक चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा गृह रक्षक दल, पलटण नाईक मीनाक्षी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महिला गृह रक्षक दल, पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली ॲलेक्स श्वान पथक, जवाहर नवोदय विद्यालय स्टुडंट पोलीस कॅडेट, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांचा समावेश होता.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रणय कांबळे, स्पृहा जोशी, आरोही केदारी, काव्या यादव, आरोही चव्हाण, शर्विल पाटील, शाश्वत ओकाटे, रुद्रा कदम, अद्वैत क्षीरसागर, सोहम मोहिते, प्रसाद जाधव, अमेय नांदिवडेकर आणि आराध्य देसाई यांचा पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राजवर्धन काळे, क्रिपाळ कांबळे, निर्मय पवार, भूमी भिंगार्डे, दक्ष निर्मळ, किरण शिंदे, अर्णव शिंदे आणि आयुष जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मुख्य सोहळ्याला नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातल्या १२ अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालं असून, त्यांपैकी दोन महिला आहेत. आज, स्वातंत्र्यदिनी झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या सर्वांचा गौरव करण्यात आला.
लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस मुख्यालयातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ गुरव, लांजा पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय साळवी, जिल्हा विशेष शाखेतील पोलीस हवालदार निशा केळकर, पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार वैदेही कदम, जिल्हा विशेष शाखेतील पोलीस हवालदार महेश गुरव, लांजा पोलीस ठाण्यातले पोलीस हवालदार आशीष शेलार या आठ जणांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे.
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विजय आंबेकर आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार अमोल गमरे यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

