रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारच्या अल्पशा विश्रांतीनंतर रविवारचा पूर्ण दिवस पुन्हा एकदा पावसाचा होता. आज (२६ मे) सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये मंडणगडमध्ये सर्वाधिक २११.२५ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात २० मेपासून सलग पाऊस सुरू असला, तरी आतापर्यंत मंडणगडमध्ये सर्वांत कमी पावसाची नोंद झाली होती. काल (२५) पावसाचा जोर जिल्ह्याच्या उत्तरेकडे वाढल्याचे दिसून आले आणि मंडणगडमध्ये सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला दापोलीत १४४.२८ मिलिमीटर, चिपळूणमध्ये १२३.६६ मिमी, संगमेश्वरमध्ये १०१.९१ मिमी, गुहागरमध्ये ९७.२० मिमी, रत्नागिरीत ९३.३३ मिमी, खेडमध्ये ८५.८५ मिमी, लांज्यात ८१.२० मिमी, तर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाच्या राजापूरमध्ये सर्वांत कमी ५९.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मुंबईत आज (२६ मे) मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून, अंधार दाटून आला आहे. पहाटेपासूनच दृश्यमानता कमी झाली होती. शहर आणि उपनगरात काही भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी भरले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांत आज वादळी वारे, विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. किंग सर्कल, दादर, अंधेरी, वांद्रे, जुहू कोळीवाडा, वडाळा, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, बीकेसी आदी भागांमध्येही पाणी साचले असून, काही रस्त्यांवरही पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यामुळे तिथली वाहतूक बंद झाली आहे. कोस्टल रोडवरची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवा दहा मिनिटे, तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे २० मिनिटं उशिराने सुरू आहे. भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास पाणी भरण्याचा धोका आहे.
रायगड जिल्ह्यात (२६ मे) मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आले असून, कर्जतला उल्हास नदी भरून वहात आहे. पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, रस्ते वाहून गेले आहेत. रोहा-चणेरा रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महाड वरून रायगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
