रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस; तीन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. आज (१६ जून) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये लांज्यात सर्वाधिक १३९.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुहागरमध्ये १३६.८० मिमी, संगमेश्वरात १२९.५० मिमी, चिपळुणात १२८.३३ मिमी, राजापुरात ११८ मिमी, खेडमध्ये १०७.२८ मिमी, रत्नागिरीत ९९.७७ मिमी, दापोलीत ९६.१४ मिमी, तर मंडणगडमध्ये ६६.५० मिलिमीटर पाऊस पडला. सकाळी नऊ वाजताच्या स्थितीनुसार, खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीची पातळी भरणे पुलाजवळ इशारा पातळीच्या वर गेली आहे. संगमेश्वर तालुक्यातली शास्त्री नदी आणि राजापूर तालुक्यातली कोदवली या नद्यांनीही इशारा पातळी ओलांडली आहे.

मुसळधार पावसामुळे दापोलीतून दाभोळला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ बंद झाली होती; मात्र पावसातही प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबवून झाड हटवून वाहतूक सुरू केली. राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी शहरातल्या जवाहर चौकापर्यंत आले आहे. संगमेश्वर तालुक्यात धामणी आणि संगमेश्वर परिसरातही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात चांदेराई ते कुरतडे या मार्गावर दरड कोसळली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळा सुरू होत असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे.

संगमेश्वर तालुक्यात धामणी-गोळवलीतल्या आमकरवाडीत काल रात्री पडलेल्या अतिपावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग खाली आला. त्यामुळे नदीकिनारी असलेली विहीर मातीने भरली. चार-पाच फूट उंचीची पोफळीची ७० रोपं मातीखाली गाडली गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुराच्या धोक्यामुळे राजापुरातली एक शाळा प्रवेशोत्सव साजरा करून नंतर लगेच सोडण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातल्या वाकेड घाटामध्ये काल मध्यरात्री दरड कोसळली. त्यामुळे एका बाजूने रस्ता बंद झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र दरड हटवण्याचे काम सकाळी हाती घेण्यात आले. खेड तालुक्यात कशेडी घाटातही काल संध्याकाळी दरड कोसळली होती.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply