रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला; जनजीवन हळूहळू सावरतेय

रत्नागिरी : गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर आज (२० ऑगस्ट) सकाळपासून थोडा कमी झाला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक १८२.१४ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल चिपळूणमध्ये १६६.६७ मिमी, दापोलीत १३९.७१ मिमी, संगमेश्वरमध्ये १३८.९१ मिमी, गुहागरमध्ये १३०.४० मिमी, रत्नागिरीत ११८.२२ मिमी, राजापुरात १११.६२ मिमी, मंडणगडमध्ये १०१.७५ मिमी, तर लांज्यात ९७.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सकाळी नऊ वाजताच्या स्थितीनुसार, खेडमधली जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून, तर राजापूरची कोदवली नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. अन्य सर्व नद्यांची पाणीपातळी ओसरली आहे.
राजापूर शहरातल्या जवाहर चौकातला पूर ओसरला असून, वाहतूक सुरू झाली आहे. जवाहर चौक ते गणेश घाट रस्त्यावर अद्याप पुराचं पाणी आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनांमुळे नुकसान झालं आहे. चिपळूणमधल्या ७६, गुहागरमधल्या ८, तर दापोली तालुक्यातल्या २८ व्यक्तींचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं आहे. संगमेश्वर, माखजनच्या बाजारपेठेत काल पाणी आलं होतं; मात्र पाऊस ओसरू लागल्याने एकंदर परिस्थिती नियंत्रणात आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply