रत्नागिरी : गणेशोत्सव सगळीकडेच होत असला, तरी कोकणातील गणेशोत्सवाची मजा काही न्यारीच. या गणेशोत्सवात आरत्यांपासून भजनांपर्यंत आणि नैवेद्याच्या पदार्थांपासून प्रथा-परंपरांपर्यंत सगळेच वेगळे असते. कोकणातील गणेशोत्सवात म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांची एक वेगळी परंपरा आहे. त्यातही रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक भागात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या वैशिष्ट्यपूर्ण असतात. लांजा तालुक्यात म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांचीही एक वेगळी परंपरा आहे. चांदोरकर ग्रुपने त्या आरत्यांची परंपरा चांगली जतन केली आहे. आरती स्पर्धेत गेली दोन वर्षे त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. वाद्यांच्या साथसंगतीने होणाऱ्या चांदोरकर ग्रुपच्या सुश्राव्य आरत्या या वर्षी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने इंद्रधनुष्य या कार्यक्रमात २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० मिनिटांनी हा आरत्यांचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. रेडिओ नसेल तरी न्यूज ऑन एअर या अॅपवरून हा कार्यक्रम जगात सर्वत्र लाइव्ह ऐकता येईल. लिंक शेवटी दिली आहे.
सध्याच्या सोशल मीडिया आणि अत्याधुनिकतेच्या दुनियेतही आपल्या पारंपरिक आरत्यांचे जतन करून त्यांच्या प्रसिद्धीसाठी चांदोरकर आणि ग्रुपचे प्रयत्न गेली काही वर्षे सुरू आहेत. कोकणात विविध ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या आरत्यांचे सादरीकरण भारावून टाकणारे असते. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अशा पारंपरिक कार्यक्रमांचे प्रसारण आवर्जून केले जाते. याच उपक्रमाच्या माध्यमातून आरत्यांचे गायन आणि त्यांचे ध्वनिमुद्रण नुकतेच आकाशवाणीच्या स्टुडिओत केले गेले. या आरती गायनामध्ये मंदार महादेव चांदोरकर, महादेव जगन्नाथ चांदोरकर, अमेय विश्वास चांदोरकर, समीर प्रशांत चांदोरकर, संदीप सुहास चांदोरकर यांचा समावेश आहे.
या आरत्यांसाठी संगीत आणि हार्मोनियमची साथ पंडित अवधूत अनंत बाम यांनी केली आहे. तबलासाथ पुष्कराज महादेव चांदोरकर, पखवाजसाथ तन्मय गजानन चांदोरकर, तर झांजसाथ समीर प्रशांत चांदोरकर यांनी केली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसारित होणारा हा प्रासंगिक कार्यक्रम ११४३khz या आकाशवाणी रत्नागिरी मध्यमलहरी वाहिनीवर, तसेच १०१.५ मेगाहर्ट्झ या एफएम वाहिनीवर २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी नऊ वाजून ३० मिनिटांनी इंद्रधनुष्य अंतर्गत प्रसारित होणार असून, हा कार्यक्रम आवर्जून ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेडिओ नसेल तरी न्यूज ऑन एअर या अॅपवरून हा कार्यक्रम जगात सर्वत्र लाइव्ह ऐकता येईल. App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

