ग-ण-प-ती या चार अक्षरांभोवती कोकणी माणसाचं धार्मिक, आध्यात्मिक, भावनिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, कला आणि श्रद्धा अशा अनेक प्रकारचं विश्व फिरत असतं. कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी गणेशोत्सवात तो आपल्या गावाकडे धाव घेतो. ते शक्य नसलं, तर मनाने तरी तो आपल्या गावी आलेलाच असतो. रत्नागिरीतला गणेशोत्सव आहेच तसा ओढ लावणारा! म्हणूनच गणेशोत्सवात इथली सगळी घरं गजबजून जातात. गणपती भाद्रपदात येत असले, तरी मूर्तिकामाला सुरुवात झाल्यापासूनच वातावरणनिर्मिती सुरू झालेली असते. अलीकडे शहरात मूर्ती दुकानांमधून विकत आणण्याची आणि मूर्तिशाळेत हाती मूर्ती घडवण्यापेक्षा साच्यातून मूर्ती घडवण्याची पद्धत वाढली आहे. ग्रामीण भागातली कुटुंबं मात्र आजही आपल्या कुटुंबाच्या पूर्वीपासूनच्या ठरलेल्या मूर्तिशाळेमध्ये गणपतीसाठी पाट देऊन दर वर्षी मूर्तीची नोंदणी निश्चित करतात. त्यामुळे ग्रामीण भागात कलेचा वारसा टिकून राहण्यास मदत होते. शाडूच्या मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना जिल्ह्यात मागणी असते. यंदा गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गव्य गणेशाच्या मूर्तींनाही चांगला प्रतिसाद मिळाला. या काळात पावसामुळे इथल्या निसर्गाने अधिकच सुंदर रूप ल्यालेलं असतं, जणू काही गणेशाच्या स्वागताचीच ती तयारी असते. १४ विद्या आणि ६४ कलांच्या अधिपतीला मोदक, पातोळे यांसह अनेक प्रकारचे पारंपरिक पदार्थ तयार करून नैवेद्य दाखवला जातो. आरत्या आणि भजनांच्या सुरांनी अवघा आसमंत डोलत असतो. नवी पिढीही यात उत्साहाने सहभागी होत असल्याचं अनेक ठिकाणचं चित्र दिलासादायक आहे.
गावोगावच्या प्रथा-परंपरा-पद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी सगळीकडच्या उत्साहाचं प्रमाण मात्र सारखंच असतं. रत्नागिरी शहराजवळच्या कर्ला-आंबेशेत गावातल्या सगळ्यांचे घरगुती गणपती एकाच मोठ्या मिरवणुकीने नेण्याची पद्धत आहे. शिस्तबद्ध आगमन मिरवणुकीच्या या अनोख्या परंपरेचं यंदा चाळिसावं वर्ष आहे. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरूखमधल्या पंतजोशींच्या चौसोपी वाड्यात भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. ही परंपरा ३८० वर्षांची आहे. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)
घरोघरी मूर्ती आणण्याच्या पद्धतीला गणपतीपुळे पंचक्रोशीतली गावं मात्र अपवाद आहेत. गणपतीपुळ्यात श्री गणेशाचं स्वयंभू देवस्थान आहे. त्या पंचक्रोशीतल्या गावांमध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे स्थानिक नागरिक घरी गणपती आणत नाहीत. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी या ग्रामस्थांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दर्शन घेता येतं. हे ग्रामस्थ तिथून आणलेल्या तीर्थाची आपल्या घरच्या प्रथेनुसार दीड, पाच किंवा सात दिवस गणपती म्हणून पूजा करतात. ही परंपरा शतकानुशतकं सुरू असून, ती कोणत्याही विशिष्ट जातीपुरती मर्यादित नाही, हे तिचं वैशिष्ट्य आहे.
जिल्ह्यात यंदा एक लाख ६९ हजारांहून अधिक खासगी आणि १२६ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. गेल्या आठवड्यातल्या अतिवृष्टीमुळे फटका बसला असला, तरी अर्थकारणाला चालना देणाऱ्या या उत्सवामुळे बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. महामार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी सरकारने टोलमाफी जाहीर केली असून, जादा रेल्वेगाड्या, एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. मुंबई, पालघर, ठाण्यातून जवळपास २९०० एसटी बस रत्नागिरीत आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या डागडुजीचं काम सुरू असून, जिल्हा प्रशासनाने महामार्गावर १६ ठिकाणी सुविधा केंद्रं उभारली आहेत. पोलीस, परिवहन, महसूल आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी त्या केंद्रात असून, कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ते सारे दक्ष आहेत. एकंदरीतच हा उत्सव सृष्टीपासून प्रत्येकाच्या मनामनापर्यंत सगळ्याच गोष्टींना नवी ऊर्जा देणारा आहे.
- अनिकेत कोनकर

