नेहमीप्रमाणे कोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव सुरू झाला आहे. दरवर्षीच्याच उत्साहाने गणपतीचे स्वागत केले जात आहे. नेहमीप्रमाणेच गावोगावचे चाकरमानी मुंबई-पुण्यातून आपापल्या गावी दाखल झाले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून आणि अगदी नेमके सांगायचे झाले तर सागरी वाहतूक बंद पडल्यापासून चाकरमानी मुंबईतून रखडत रखडत का होईना, आपापल्या गावी मोठ्या ओढीने दाखल होतात. गणपतीशी त्यांचे असलेले अतूट नाते त्यांना त्यांच्या घराकडे ओढून आणत असते. सागरी नौकांची वाहतूक बंद पडल्यानंतर प्रवाशांच्या वाहतुकीची व्यवस्था एसटीने केली. ती अव्याहत सुरू आहे. मात्र कोकणवासीयांच्या नशिबात अजूनही चांगल्या रस्त्यांचे सौख्य नाही.
दरम्यानच्या काळात कोकण रेल्वे सुरू झाली. तिचा पुरेपूर उपयोग कोकणवासीयांनी घेतला. पण रेल्वे काही गावागावांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी एसटीसारखे वाहतुकीचे प्रभावी आणि किफायतशीर दुसरे साधन नाही. मुंबई-पुण्यातून गावोगावच्या वाडीवस्त्यांपर्यंत जाणाऱ्या एसटीच्या विशेष गाड्या सोडल्या जातात. मात्र ती संख्याही अपुरे ठरते. त्यामुळे अनेक चाकरमानी खासगी वाहनांचा आसरा घेतात. ज्यांना शक्य असेल ते चाकरमानी स्वतःच्या वाहनांनी गावाकडे पोहोचतात. पण त्यांचा हा सारा प्रवास पूर्णपणे खड्ड्यांमधूनच होतो. अकरा वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. महामार्गाच्या पाहणीसाठी दरवर्षी दौरे होतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचा दौरा काही काळापूर्वी झाला. राज्याच्या मंत्र्यांचे दौरे झाले. पालकमंत्री तर सातत्याने दौरे करतच असतात. दौऱ्यात नेते पाहणी करतात. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले जातात. दिलेल्या आश्वासनांची, आढावा बैठकांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. तरीही चाकरमान्यांचा प्रवास धक्के खाल्ल्याशिवाय होतच नाही. महामार्ग रखडला आहेच, पण गावे आणि शहरांमधील रस्ते तरी कुठे चांगले आहेत? खुद्द रत्नागिरी शहराचे उदाहरण त्यासाठी देता येईल. रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. ते सुशोभित दिसावे, यासाठी असंख्य पुतळे ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. पण शहराच्या प्रवेशद्वारापासूनच रस्त्यातील खड्डे सुरू होतात. मारुती मंदिर, एसटी बसस्थानक, आठवडा बाजार, काँग्रेस भवनचा परिसर, राम आळी, मारुती आळी हे प्रमुख रस्ते आणि या प्रमुख रस्त्यांना जोडणारे शहरातील छोटे रस्ते यापैकी कोणताही रस्ता खड्डेमुक्त नाही. खेड, दापोली, चिपळूण, लांजा, राजापूर या प्रमुख शहरांची स्थितीही फारशी वेगळी नाही. रत्नागिरीचा राजा, राजापूरचा राजा, चिपळूणचा राजा असे गावोगावचे राजे गणपतीच्या रूपात प्रतिष्ठापित होत असतात. त्याला राजकीय पाठबळ देणारी नेतेमंडळी रस्ते ही मूलभूत सुविधा मात्र निर्वेधपणे उपलब्ध करून देऊ शकत नाहीत.
कोकणात येणाऱ्यांना यापुढे चाकरमानी असे म्हणायचे नाही, तर कोकणवासी म्हणायचे असा आदेशच उपमुख्यमंत्र्यांनी काढला आहे. चाकरमानी म्हणण्याऐवजी कोकणवासी म्हटले म्हणून त्यांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासात काही बदल होणार नाही. पण या त्रासाकडे त्यांचे दुर्लक्ष व्हावे, आपण कोकणवासी आहोत याची तसेच कोकणवासीयांनी नेहमी त्रासातच जीवन जगले पाहिजे याची जाणीव त्यांना करून द्यावी, यासाठी जणू त्यांना चाकरमानी म्हणण्याऐवजी कोकणवासी म्हणावे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे. किती तो कोकणाचा कळवळा! नेहमीच येणारा पाऊस, त्यामुळे कोकणवासीयांची उडणारी दाणादाण, नेहमीच येणारा गणेशोत्सव, त्या काळात चाकरमान्यांना भोगावा लागणारा त्रास वर्षानुवर्षे तसाच आहे. वाहतुकीच्या सुविधा पुरविण्याच्या आश्वासनांच्या पावसात रस्ते मात्र वाहून गेले आहेत. यापुढेही ते तसेच वाहत राहतील. सण संपवून चाकरमानी परततील. खड्डे विसरतील. अगदी दरवर्षी येणाऱ्या गणपतीप्रमाणेच पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यांमधून कोकणात आपापल्या गावी येतील.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २९ ऑगस्ट २०२५)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

