आश्वासनांच्या पावसात वाहून गेले रस्ते

नेहमीच येणारा पाऊस, त्यामुळे कोकणवासीयांची उडणारी दाणादाण, नेहमीच येणारा गणेशोत्सव, त्या काळात चाकरमान्यांना भोगावा लागणारा त्रास वर्षानुवर्षे तसाच आहे. वाहतुकीच्या सुविधा पुरविण्याच्या आश्वासनांच्या पावसात रस्ते मात्र वाहून गेले आहेत. यापुढेही ते तसेच वाहत राहतील. सण संपवून चाकरमानी परततील. खड्डे विसरतील. अगदी दरवर्षी येणाऱ्या गणपतीप्रमाणेच पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यांमधून कोकणात आपापल्या गावी येतील.

स्वातंत्र्यावर मर्यादा हवी

लोकांनी आपल्या प्रतिनिधींना सभागृहामध्ये उपस्थित राहून काम करण्यासाठी निवडून दिलेले असते. सातत्याने सभात्याग करणे म्हणजे लोकांच्या मतांचा अनादर आणि त्यांच्याशी केलेली प्रतारणाच आहे. भलेही सरकारने मांडलेले मुद्दे पटत नसले, तरी त्यासाठी सभागृहातून बाहेर पडायलाच हवे असे नाही. किंबहुना लोकप्रतिनिधींनी सभागृहात उपस्थित राहणेच अत्यावश्यक आहे. ते सभागृहातील नियोजित कामकाजाच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वेळ सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर ती त्यांची अनुपस्थिती समजून खासदारकीच रद्द करण्याची तरतूद केली गेली पाहिजे.

सायबर संस्कारांना प्रारंभ

आजच्या युगात सायबर संस्कार या सतराव्या संस्काराची गरज आहे, हे पटवून देणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत अभियंता अक्षय फाटक यांनी अलीकडेच केला. मोबाइलमुळे फसवणुकीचे जे अनेक गुन्हे घडतात, त्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. राजापूर तालुक्यातील एका गावाने याबाबतचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. वयाची १८ वर्षे होईपर्यंत आपल्या मुलाला पालकांनी वैयक्तिक मोबाइल घेऊन देऊ नये, असा निर्णय या गावात घेण्यात आला आहे.