रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने जागर

आजगाव (ता. सावंतवाडी) : येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग मासिक त्रेसष्टावा कार्यक्रम सातार्डा येथील महापुरुष मंदिरात झाला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने जागर करण्यात आला.

सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय यांच्या सहयोगाने झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक कै. रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘शब्दांचा जादूगार-रवींद्र पिंगे’ हा कार्यक्रम आखण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.गजानन मांद्रेकर यांनी कै. पिंगे यांच्या लेखनाची अल्पाक्षरी, मर्मशोधक, रसाळ आदी वैशिष्ट्ये उदाहरणांसहित विशद केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी पिंगेंच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगतना काही उताऱ्यांचे वाचन केले. उभरती साहित्यिक सौ. स्नेहा नारिंगणेकर यांनीही कै. पिंगे यांच्या लेखनाविषयी आपले विचार मांडले. कट्ट्याच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती सरोज रेडकर व सोमा गावडे यांनी कै. पिंगे यांच्या ‘आनंदपर्व’ या ललित लेखसंग्रहातील अनुक्रमे ‘पंजाबी धाबा : एक फर्मास खाद्यसंस्कृती’ व ‘साधी बाळबोध सुखं’ या लेखांचे अभिवाचन केले.

ग्रंथालयाचे अध्यक्ष तथा निवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मांजरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रायोजक ज्ञानदीप राऊळ, आरोंदा हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक अरुण धर्णे, स्थानिक पोलीस पाटील सौ. वनिता मयेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सावळाराम शिरोडकर,सौ. शर्मिला मांजरेकर व सौ.श्रुतिका बागकर उपस्थित होते. परिसरातील पन्नासहून अधिक श्रोत्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply