Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

नवी CSMT–सावंतवाडी एक्स्प्रेस प्रवासासाठी घेणार तब्बल १४ तास २० मिनिटे!

नवी CSMT–सावंतवाडी एक्स्प्रेस प्रवासासाठी घेणार तब्बल १४ तास २० मिनिटे!
Advertisements

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या दैनिक एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला असला, तरी हा प्रवास अत्यंत वेळखाऊ होणार आहे. मुंबईतून सावंतवाडीला जाणाऱ्या अन्य दैनिक गाड्यांच्या तुलनेत या गाडीला सर्वाधिक वेळ लागणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, १५०८७ CSMT– सावंतवाडी रोड एक्स्प्रेस CSMTहून रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. म्हणजेच या गाडीला ५१० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल १४ तास २० मिनिटे लागणार आहेत. परतीच्या प्रवासात १५०८८ सावंतवाडी रोड–CSMT एक्स्प्रेस सावंतवाडी रोड येथून सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी CSMT येथे पोहोचेल. या प्रवासासाठी १३ तास २० मिनिटे लागणार आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या वेळा नमूद करण्यात आल्या आहेत. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

सध्या लागू असलेल्या पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई परिसरातून सावंतवाडी रोडकडे दररोज धावणाऱ्या प्रमुख गाड्यांच्या वेळांशी या नव्या गाडीच्या वेळेची तुलना करू या. दादरहून रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी ११००३ तुतारी एक्स्प्रेस दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचते आणि तिचा प्रवास १२ तास ४५ मिनिटांचा आहे. दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सुटून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचते; तिचा प्रवास १२ तास २० मिनिटांचा आहे. CSMTहून सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटणारी १०१०३ मांडवी एक्स्प्रेस सायंकाळी ७ वाजता सावंतवाडीला पोहोचते. म्हणजेच ११ तास ५० मिनिटे घेते. रात्री ११ वाजून २ मिनिटांनी सुटणारी २०१११ कोकणकन्या एक्स्प्रेस सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी पोहोचते; तिचा प्रवास ९ तास ४४ मिनिटांचा आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुटून दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी पोहोचते आणि तिचा प्रवास ९ तास ३२ मिनिटांचा आहे. सर्वांत कमी वेळ घेणारी १२१३३ मंगळुरू एक्स्प्रेस CSMTहून रात्री ९ वाजून ५४ मिनिटांनी सुटून सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचते; तिचा प्रवास ९ तास ८ मिनिटांचा आहे. एवढेच नव्हे, तर सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेसपेक्षाही नवी गाडी दोन तास अधिक वेळ घेणार आहे.

सावंतवाडीहून मुंबईकडे येणाऱ्या अन्य दैनिक गाड्यांशी तुलना केली, तरी १५०८८ एक्स्प्रेसचा प्रवास अधिक दीर्घ असल्याचे दिसते. १५०८८ सावंतवाडी रोड–CSMT एक्स्प्रेस सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी CSMTला पोहोचणार आहे. त्यामुळे तिचा प्रवास १३ तास २० मिनिटांचा आहे. याच मार्गावर सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी सुटणारी ११००४ तुतारी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी मुंबईत पोहोचते आणि तिचा प्रवास १२ तास ४५ मिनिटांचा आहे. १०१०४ मांडवी एक्स्प्रेस सकाळी १० वाजून ४ मिनिटांनी सुटून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचते; तिचा प्रवास ११ तास ४१ मिनिटांचा आहे. सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी १०१०६ सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेस रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचते आणि ११ तास ३० मिनिटे घेते. १२१३४ मंगळुरू–CSMT एक्स्प्रेस रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी सुटून सकाळी १० वाजून ३२ मिनिटांनी पोहोचते; तिचा प्रवास १० तास ३६ मिनिटांचा आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी सुटून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचते आणि तिचा प्रवास १० तास २८ मिनिटांचा आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस सायंकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी सुटून सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी CSMTला पोहोचते; तिचा प्रवास १० तास ८ मिनिटांचा आहे. त्यामुळे १५०८८ ही परतीची गाडीही तुलनेतील अन्य दैनिक गाड्यांपेक्षा अधिक वेळ घेणार असल्याचे स्पष्ट होते. तुतारी एक्स्प्रेसच्या तुलनेत तिचा प्रवास ३५ मिनिटांनी, तर कोकणकन्येच्या तुलनेत ३ तास १२ मिनिटांनी अधिक आहे.

नियमित सेवा आणि आरक्षणाबाबत अद्याप अस्पष्टता या गाडीच्या उद्घाटनाची विशेष फेरी ३ सप्टेंबर रोजी ०१००१ या क्रमांकाने चालवण्यात आली. कोकण रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार उद्घाटनाची गाडी CSMTहून दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री २ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचली; मात्र रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धिपत्रकात १५०८७/१५०८८ या नियमित दैनिक गाड्या नेमक्या कोणत्या तारखेपासून धावणार, याचा स्पष्ट उल्लेख नाही. तसेच ५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन आरक्षण यंत्रणेमध्ये या गाडीचे नियमित आरक्षण उपलब्ध झाल्याचे स्पष्टपणे दिसत नव्हते. एका रेल्वे वेळापत्रक संकेतस्थळावरही १५०८७समोर “Train not yet introduced” अशी नोंद दिसत होती. त्यामुळे उद्घाटन झाल्यानंतर नियमित सेवा कोणत्या दिवसापासून सुरू होणार, आरक्षण कधी खुले होणार आणि प्रसिद्ध केलेल्या वेळांमध्ये पुढे काही बदल होणार का, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट माहिती जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

नवी दैनिक गाडी मिळाल्यामुळे कोकणातील प्रवाशांना अतिरिक्त आसनक्षमता आणि अनेक स्थानकांसाठी थेट प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मात्र उपलब्ध वेळापत्रकाचा विचार करता, या गाडीमुळे प्रवासाचा वेळ वाचण्याऐवजी अन्य दैनिक गाड्यांच्या तुलनेत अधिक वेळ प्रवासात घालवावा लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version