खेड : ‘आपल्या माणसांत, आपल्या वस्तीवर’ या सहज, सुंदर भावनेतून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आंबवलीतील देवळवाडी येथे ‘आपुलकीचा मुक्काम’ करत ग्रामस्थांशी थेट आणि आत्मीय संवाद साधला.
सत्तेच्या झगमगाटापेक्षा मातीची नाळ आणि सामान्यांचा जिव्हाळा अधिक मोलाचा असतो, याची प्रचrती देणारा एक अनोखा प्रसंग खेड तालुक्यातील आंबवली गावात अनुभवता आला. संध्याकाळच्या वेळी देवळवाडीत दाखल झालेल्या राज्यमंत्र्यांचे स्वागत कोणत्याही औपचारिक प्रोटोकॉलने नव्हे, तर कोकणी माणसाच्या अथांग प्रेमाने व पारंपरिक उत्साहाने झाले. भारतीय सैन्यदलात देशसेवा बजावलेल्या यादव कुटुंबाच्या सुमारे ६० वर्षे जुन्या, शेणाने सारवलेल्या आणि कौलारू कोकणी घरात त्यांनी रात्रभर मुक्काम केला. चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेत आणि जुन्या बैठकीत बसून त्यांनी कोकणच्या अस्सल संस्कृतीचा, साधेपणाचा व ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
रात्रीच्या शांत वातावरणात घराच्या पडवीत बसून यादव कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी रंगलेल्या गप्पांनी केवळ लोकप्रतिनिधी नव्हे, तर कुटुंबातीलच एक सदस्य असल्याचे वातावरण ठरले. गावातील पाण्याचे प्रश्न, रस्ते, आरोग्य, शेती आणि रोजच्या जगण्यातील आव्हाने त्यांनी अत्यंत बारकाईने ऐकून घेतली.
यावेळी भावना व्यक्त करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, "विकासाची खरी व्याख्या मंत्रालयाच्या फायलींमधून नव्हे, तर खेड्यापाड्यातील घरांच्या उंबरठ्यावरून ठरते. सामान्य माणसाच्या डोळ्यांतील अपेक्षा आणि त्याच्या रोजच्या संघर्षाची जाणीव असणे हे लोकप्रतिनिधीचे आद्यकर्तव्य आहे. अंबवलीत मिळालेली मायेची ऊब आणि निखळ आपुलकी माझ्या मनात कायम घर करून राहील."
जनसंवादाचा नवा अध्याय केवळ घोषणा आणि दौऱ्यांपुरते मर्यादित न राहता, थेट ग्रामस्थांच्या अंगणात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणारा हा ‘आपुलकीचा मुक्काम’ उपक्रम कोकणात विशेष चर्चेचा ठरत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रत्यक्ष जागेवर जाऊन सोडवण्यासाठी आणि प्रशासनाला लोकाभिमुख करण्यासाठी ही साधी, संवेदनशील पावले अत्यंत प्रभावी ठरतील, असा विश्वास परिसरातून व्यक्त होत आहे.


