Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

मुंबई विद्यापीठाची आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरीत सुरू

मुंबई विद्यापीठाची आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरीत सुरू
Advertisements

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेचं आज (२५ ऑक्टोबर) रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात उद्घाटन झालं. ५१ महाविद्यालयांमधल्या १०० महिला आणि १०० पुरुष अशा २०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून, त्या चार दिवस चालणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन झालं. "कोकणातूनही जास्तीत जास्त खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवडले गेले पाहिजेत. याकरिता मुंबई विद्यापीठाच्या किमान पाच ते १० स्पर्धा कोकणातच व्हायला हव्यात," असं प्रतिपादन या वेळी डॉ. रेड्डी यांनी केलं. "मुंबई विद्यापीठात दर वर्षी ४० प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात. त्यातून यंदापासून प्रथमच सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडू निवडण्यात येणार आहेत. तसंच क्रीडा संचालकांना पारितोषिक आणि 'मिशन ऑलिंपिक मोड'वर प्रशिक्षकांसाठीही विशेष तरतूद करण्यात येत आहे," असंही डॉ. रेड्डी यांनी सांगितलं. "मोबाइलवर खेळणारी मुलं मैदानावर खेळायला आली, तर त्यांचा शारीरिक, मानसिक विकास होईल आणि ती अभ्यासातही चांगली कामगिरी करू शकतील," असं डॉ. रेड्डी म्हणाले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळा, महाविद्यालयांत हजारो विद्यार्थी शिकत असून, आपले खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिंपिकला न्यायचे असतील तर शालेय जीवनातच क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी लागेल ते सहकार्य करू," अशी ग्वाही रेड्डी यांनी दिली. सुट्टीचा वार असूनही महाविद्यालय, प्राचार्य, उपप्राचार्य, प्रबंधक यांच्यासमवेत सर्व टीम काम करत असल्याचे पाहून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपले प्रयत्न योग्य दिशेने असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी जिमखाना विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तायक्वांदोचे आंतरराष्ट्रीय रेफ्री आणि राष्ट्रीय फेडरेशनचे संचालक सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतून निवड झालेले विद्यार्थी राजस्थान आणि नोएडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तायक्वांदो हा खूप शिस्तीचा खेळ असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळात भारताला पदक मिळावं, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी विद्यापीठाचा शुभम शेट्टी हा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला. त्यासाठी विद्यापीठाने अडीच लाख रुपये अनुदान दिलं होतं. अशा प्रकारे खेळाडूंसाठी निधी देण्याकडे कल आहे, असं डॉ. रेड्डी यांनी सांगितलं. या वेळी शुभमचा डॉ. रेड्डी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

"तीन वर्षांपासून सेन्सरवर स्पर्धा घेत आहोत. तसंच नवीन नियमांचा अवलंब केला जात असून. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंचही येतात. खेळाची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी विद्यापीठातर्फे खेळाडूचे वजन केले जाते, वेळापत्रक सर्वांसमोरच तयार केले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच सुभाष पाटील यांनी भारतभर नाव कमावले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित व दर्जेदार पंच काम पाहणार आहेत. विविध संघटनांमुळेही तायक्वांदो खेळ वाढत आहे. स्पर्धेत काही चूक झाल्यास पुढील स्पर्धेवेळी सुधारणा करू," अशी ग्वाही मनोज रेड्डी यांनी दिली.

खेळामुळे मानसिक संतुलन : डॉ. चंद्रशेखर केळकर अध्यक्षीय मनोगतात डॉ. चंद्रशेखर केळकर म्हणाले, की "तायक्वांदो या खेळामध्ये नुसते आत्मरक्षण नसून शिस्त, आत्मविश्वास, एकाग्रता, संयम आणि आत्मनियंत्रणाचा मोठा संगम आहे. खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. खेळामुळे शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक संतुलन आणि उत्तम आरोग्य लाभते. मैदानावरील प्रत्येक खेळाडू जिंकण्याच्या जिद्दीने उतरत असला, तरी विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हरलेल्या खेळाडूंना चुका सुधारून भविष्यात अधिक चांगला खेळ करण्याची संधी मिळते."

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले, "आमचे महाविद्यालय स्वातंत्र्यपूर्व काळातील (१९४५ मध्ये स्थापन झालेले) असून, या स्वायत्त महाविद्यालयात सुमारे ७,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे विविध २८ विषयांमध्ये पदवी, १६ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि ८ विषयांमध्ये पीएचडी अभ्यासक्रम उपलब्ध आहे."

शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन डॉ. केळकर, डॉ. साखळकर, डॉ. भिडे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रा. मृदुला जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनोद शिंदे यांनी आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version