रत्नागिरीत बुधवारी विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या छप्पन्नाव्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन येत्या ९ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाविश्वात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे एक आगळेवेगळे स्थान आहे. सळसळत्या तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालय कायमच प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून मिळते. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवारी महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या छप्पन्नाव्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव होणार आहे. दक्षिण रत्नागिरी झोनमधून १६ महाविद्यालयांतील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. दिवसभर रंगणाऱ्या या तरुणाईच्या सांस्कृतिक महोत्सवात विविध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकनृत्य, एकांकिका, एकपात्री अभिनय, नृत्य, संगीत, गायन, वादन, वादविवाद, कथाकथन, मातीकाम, रांगोळी अशा सुमारे ४० कलाप्रकारातील स्पर्धा होणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि नेतृत्वगुणांचा विकास करणाऱ्या या महोत्सवाच्या संयोजनासाठी रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. महोत्सव विद्यार्थांसाठी असून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि महाविद्यालयाने घालून दिलेले मूल्ये, शिस्त इत्यादींशी अधिष्ठित राहून रसिक विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले आहे.

महोत्सवाचे उद्घाटन सकाळी १० वाजता राधाबाई शेट्ये सभागृहात होईल. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply