मुंबई विद्यापीठ विभागीय युवा महोत्सव वैभववाडीत

वैभववाडी : मुंबई विद्यापीठाचा छप्पन्नावा विभागीय युवा महोत्सव प्रथमच वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणार आहे. हा महोत्सव १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

विभागीय युवा महोत्सवाच्या नियोजनाची बैठक आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन. व्ही. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७ महाविद्यालयांमधील सांस्कृतिक विभाग समन्वयक उपस्थित होते. बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक समन्वयक डॉ. आशीष नाईक आणि सहाय्यक समन्वयक नितीन वळंजू यांनी मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, समूह गायन, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, रांगोळी, पोस्टरमेकिंग, क्ले मॉडेलिंग, कोलाज, मेंदी, स्पॉट पेंटिंग, तालवाद्य, सूर वाद्य, एकांकिका, मूक अभिनय, स्किट, मिमिक्री अशा एकूण ४२ कलाप्रकारांचा समावेश असेल. सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत.

या विभागीय महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे पदाधिकारी तसेच सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे तसेच सर्व कलाप्रकारातील दिग्गज परीक्षक उपस्थित राहणार आहेत. विभागीय महोत्सवामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या अंतिम स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

सांस्कृतिक युवा महोत्सवाचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता महाराणा प्रतापसिंह संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जन विनायक रावराणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंबई विद्यापीठातील विविध तसेच महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सहायक प्रा. डी. एस. बेटकर, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, महाविद्यालयाचे अधीक्षक संजय रावराणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सांस्कृतिक युवामहोत्सव समिती सदस्य सहायक प्रा. नीलेश कारेकर (8275664956), डॉ. एम. आय. कुंभार (9421148002), डॉ. व्ही. ए. पैठणे (8010326422) किंवा सहायक प्रा. आर. ए. भोसले (7517284228) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply