रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगतेनिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. १३ ऑगस्ट) तिरंगा सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सायकल फेरी काढली होती. भर पावसात १०० सायकलिस्ट रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यात हर घर तिरंगा या अभियानाच्या प्रसारासाठी फिरले होते. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही तेवढ्याच उत्साहात सायकल फेरी काढण्यात येणार आहे.
फेरीतील सहभागी सायकलस्वारांना सायकलला लावण्यासाठी छोट्या आकारातील तिरंगा राष्ट्रध्वज नजीकच्या टपाल कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहे. तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी स्वारांनी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी रत्नागिरीत जिल्हा सायकल संमेलनाचे आयोजन तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सायकल फेरी काढून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने जनजागृती केली आहे. त्यामुळे या फेरीसाठीही नियोजन करण्यात येत आहे.
रविवारी, १३ ऑगस्टला सकाळी ८ वाजता ही सायकल फेरी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथून सुरू होणार आहे. नाचणे रोड, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ, रामआळी, गाडीतळ, टिळक आळी, बंदर रोड, आठवडा बाजारमार्गे ती जयस्तंभापर्यंत पोहोचेल. फेरीमध्ये १० वर्षांवरील विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे.
अधिक माहितीसाठी डबल एसआर अमित कवितके (99705 57055), एसआर डॉ. नितीन सनगर (96898 66099), दर्शन जाधव (9970398242) किंवा महेश सावंत (बॉबी) (7744085581) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे.
सायकल चालवणे हेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे शुल्क
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर अनेक सायकलिस्ट आता रत्नागिरीच्या रस्त्यावर दिसू लागले आहेत. रत्नागिरीत सध्या १०० हून अधिक सायकलस्वार क्लबचे सदस्य असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. क्लबचे सदस्यत्व घेण्याकरिता आठवड्याला किमान ७५ आणि महिन्याला किमान ३०० किमान किलोमीटर सायकल चालवण्याचे अनोखे शुल्क आकारले जाते. रत्नागिरीत सायकलसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब अनेकविध उपक्रम राबवत आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

