Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

राज्यस्तरीय थ्री-डी रांगोळी स्पर्धेत केदार टेंबकर यांनी मिळवला प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय थ्री-डी रांगोळी स्पर्धेत केदार टेंबकर यांनी मिळवला प्रथम क्रमांक
Advertisements

रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त भारत शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या थ्री डी रांगोळी स्पर्धेत कुडाळच्या केदार टेंबकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तानपुरा घेऊन आराम करणाऱ्या आजोबांची रांगोळी त्यांनी साकारली होती. प्रचंड मेहनत घेऊन आणि सुमारे २४ तासांहून अधिक काळ बसून ही रांगोळी त्यांनी चितारली. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक किशोर पांचाळ (मुंबई) यांनी साकारलेल्या गणपतीच्या रांगोळीला, तर तृतीय क्रमांक विकास गायकवाड (वारणा, कोल्हापूर) यांनी चितारलेल्या मासे विकणाऱ्या महिलेच्या रांगोळीला मिळाल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह धनेश रायकर यांनी दिली. अभिषेक सुतार (भांडुप, मुंबई), विजय मेस्त्री (कुडाळ), ओम मोरे (छत्रपती संभाजीनगर), निवृत्ती धुळे (अमरावती), प्रशांत आर्वी (नाशिक) यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. या चुरशीच्या स्पर्धेत सुमारे २५ रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. स्पर्धकांना रांगोळी साकारण्यासाठी एक दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. पटवर्धन हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात थ्री डी रांगोळी स्पर्धा या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्याच्या विविध भागांतून स्पर्धक सहभागी झाले होते.

या रांगोळ्यांचे प्रदर्शन १२ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. थ्री डी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेला कलात्मकतेचा अनोखा आविष्कार यातून पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनात गणपती, बाळकृष्ण, खेकडा, फुटबॉलपटू, पुस्तक वाचणारी मुलगी, मराठमोळी महिला, किटलीतून कपात चहा ओतताना, लहान बालक अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत. परीक्षक म्हणून प्रभावती पिलणकर, विक्रांत मेस्त्री, सागर पुसाळकर यांनी काम पाहिले. प्रथम विजेत्याला १२ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १० हजार व तृतीय क्रमांकाला आठ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी तीन हजार रुपयांची होती. कार्यवाह धनेश रायकर यांनी सांगितले, की यंदा प्रथमच पटवर्धन हायस्कूलमध्ये 'राज्यस्तरीय रंगयात्रा २०२६ – कलेचा आविष्कार, खरेदीचा बहार' या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल्स हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. ज्वेलरी, कपडे, गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, तसेच विविध आकर्षक उत्पादनांची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. खरेदीच्या महोत्सवासोबतच थ्री डी रांगोळी प्रदर्शन आणि विशेष शोभिवंत मत्स्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. खरेदी, कला, खाद्यसंस्कृती आणि मनोरंजन यांचा संगम असलेल्या या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्ष सौ. नमिता कीर आणि कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version