रांगोळीकार प्रमोद आर्वी यांनी साकारली `श्यामलहरी` भारतरत्न गानसम्राज्ञी

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रांगोळी कलाकार प्रमोद माळी (आर्वी) यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य आणि सुंदर रांगोळी साकारली आहे. यापूर्वीही अनेक रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या अनोख्या कलेने सर्वांना आपलेसे केले आहे. याही रांगोळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मालेगाव येथील प्रमोद आर्वी गेल्या ९ वर्षांपासून रांगोळी कलेचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी चित्रकलेमध्ये, पेन्सिल स्केच, ऑइल कलर, रांगोळी, लहान-मोठ्या मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण दिले आहे. परंतु त्यांना रांगोळीमध्ये खूप आवड असल्याने त्यांनी ८ वर्षे पूर्वीच ठरवले होते की आपल्या आयुष्यात आपल्याला एक मोठा रांगोळी कलाकार म्हणून ओळखले जावे. रांगोळी कलाक्षेत्रात खूप प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळावा. यासाठी त्यांनी रांगोळीमध्ये शून्यातून सुरुवात केली. त्यावेळी त्यांना रांगोळीचे मार्गदर्शन करणारे कुणीही नव्हते, तरीदेखील हताश न होता प्रमोद आर्वी यांनी सुप्रसिद्ध रांगोळीकार असा नावलौकिक मिळविला आहे. प्रमोद आर्वी अनेक चुकांमधून शिकत गेले आणि पुढे त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरदेखील आपल्या रांगोळीने रसिकांचे मने जिंकली आहेत. त्यांनी रांगोळी कलेला आज एक उंच दर्जा देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

आजपर्यंत प्रमोद आर्वी यांनी अनेक देवदेवतांच्या, नावाजलेल्या थोर कलावंतांच्या भव्य दिव्य रांगोळी कलाकृती साकारलेल्या आहेत. आता त्यांनी सुप्रसिद्ध गायिका, भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य रांगोळी साकारली आहे. त्यांची रांगोळी काढून सर्व रसिकांना आनंद देण्याची प्रमोद आर्वी यांची खूप आधीपासून इच्छा होती, पण त्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जेदार रांगोळी कला शिकण्याची आवश्यकता होती. आपण रांगोळीची कला आत्मसात करू, तेव्हा लता मंगेशकर यांची रांगोळी काढायची, असे त्यांनी ठरवले होते. आज तीच वेळ आली आहे.
प्रमोद आर्वी यांनी लता मंगेशकर यांच्या या भव्य रांगोळीचे शीर्षक “श्यामालहरी” असे ठेवले आहे. ह्या रांगोळी साकार करण्यासाठी त्यांना 48 तास लागले. त्यांनी केलेल्या सर्व रांगोळी कलेचा आजवरचा अनुभव घेऊन ही रांगोळी साकारली आहे.
प्रमोद आर्वी अभिमानाने सांगतात की रांगोळी कला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. रांगोळीमध्ये अनेक सामाजिक, राजकीय आणि समाजप्रबोधक विषय मांडता येतात. आज रांगोळी कलेने मोठे शिखर गाठले आहे. रांगोळी साकारण्यासाठी रसिकांचे आशीर्वाद आणि हार्दिक शुभेच्छा पाठीशी आहेत, म्हणूनच आजपर्यंत रांगोळी कला क्षेत्रात कार्य करू शकलो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

  • निकेत पावसकर, तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग)
    (9860927199, 9403120156)
  • रांगोळी साकारतानाचा व्हिडीओ पाहा सोबतच्या लिंकवर

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply