मुंबई-गोवा महामार्गावरचा सर्वांत लांबीचा पूल उभारतानाच कोसळल्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औपचारिकतेपलीकडे जाऊन त्याचा विचार करायला हवा. रस्त्यामधल्या खड्ड्यांपेक्षा विकासकामे किती उभी केली आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, असे पालकमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याची आठवण यानिमित्ताने झाली. पण रस्त्यांमधील खड्डे आणि कोसळणारे पूल यातून जीव वाचला, तरच त्या विकासाची फळे चाखता येणार आहेत, हेही लक्षात ठेवायला हवे.
